वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्यांची कर्तृत्त्वगाथा: ‘आपली माणसं ‘

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कारासह सुमारे चारेक डझन पुरस्कार प्राप्त ख्यातकीर्त कवी, समीक्षक आणि अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारे प्रा. शिवाजी वाठोरे सर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला व्यक्तिचित्रणाचा ग्रंथ ‘आपली माणसं.’ यात लेखकाशी भेटलेल्या आणि संपर्कात असलेल्या जवळपास ५९ व्यक्तींच्या बाबत आलेले भले – बुरे अनुभव जसे चित्रित आहेत तसेच त्यांच्या जीवनावर भाष्य करीत त्या व्यक्ती अंतर्बाह्य स्वरूपात उभ्या केलेल्या आहेत. यातील सर्वच व्यक्तिचित्रणे विविधांगी, सर्वसमावेशक आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहेत तद्वतच प्रादेशिकदृष्ट्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत.

    ‘आपली माणसं’ बारकाईने बघितल्यास असे लक्षात येते की, यात शैक्षणिक, सहकार, सामाजिक, कृषी, राजकीय अशा विविध क्षेत्राशी संबंधित व्यक्तिचित्रणांचा समावेश करण्यात आलेला आहे. लेखक तरल, संवेदनशील आणि कविमनाचे असल्याने सर्वच व्यक्तिचित्रणे उठावदारपणे साकारण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. यात चित्रित व्यक्ती दिसतात कशा, वागतात कशा इथपासून तर त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांच्या नोंदी चपखलपणे घेण्यात आलेल्या असल्याने ग्रंथातील मजकूर लालित्यपूर्ण होण्यास मदत झालेली आहे, असे म्हणता येईल. वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे यांच्यापासून ते माजी मंत्री माणिकराव पालोदकर, कृषिभूषण कुमारराव अन्वीकर, कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. गंगाधर पानतावणे अशा दिग्गज व्यक्तिमत्वाबरोबरच तमाशा कलावंत हरिभाऊ अन्वीकर, माजी मंत्री अ. सत्तार अ. नबी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटलेले चंद्रकांत झाल्टे महाराज, व्यापारी सीताराम अग्रवाल, राधेश्याम गुप्ता, पत्रकार स. सो. खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ते दिनकर ओंकार, सुनील वाकेकर, अरुणकुमार लेमाडे, डॉ. पंडित किल्लारीकर, ‘ भटक्या ‘ कार के. ओ. गिऱ्हे, रा. रं. बोराडे, प्रा. अविनाश डोळस, भा . दो.पाटील, हुनर सिल्लोडी अशी विविध क्षेत्रात आपापल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी माणसं यात भेटतात. ती अंतर्बाह्य जशीच्या तशी प्रकटतात, तेव्हा बसल्या- बसल्या वाचकांस त्यांच्या भेटीचा अनुभव आल्यावाचून रहात नाही. ही माणसं जशीच्या तशी सजीवंत

 वाचकांसमोर उभी ठाकतात, याची वानगीदाखल काही उदाहरणे पहा:

  “भा. दो. गेल्याचं कळलं आणि पांढरा ट्राउझर, सदरा त्यावर हमखास जॅकेट असा पोशाख परिधान केलेलं साधारणपणे साडेपाच फुटाच्या आत बाहेर उंची असलेलं गोऱ्या रंगाचं गुटगुटीत व्यक्तित्व डोळ्यासमोर साक्षात उभं राहिलं.

  मुळात चाळीसगाव येथे जन्मलेल्या भा. दो. पाटील यांनी लोणावळ्या जवळील उरुळी कांचन येथे प्रदीर्घ काळ मुख्य अध्यापक म्हणून सेवा दिली. विविध शैक्षणिक प्रयोग केले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम शिक्षक म्हणून १९७५ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार प्राप्तीचा त्यांनी कधी अहंगंड मानला नाही, ना कधी मिरवला नाही.” (पान क्र.९३)

किंवा –

  परभणीच्या एका प्राध्यापकाची कुठलीशी एक शैक्षणिक संशोधन संस्था असून ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे, असे मला समजताच मी धावत – पळत जाऊन सदरील प्राध्यापकाची भेट घेतली. सरांशपत्रिका (सिनेपसिस) सदर केली. फिसचे थोडेफार पैसेही जमा केले. (अर्थात विना पावतीचे) त्या नंतर अनेक दिवस काहीही निरोप नाही. दरम्यान, एकनाथ खिल्लारे यांच्या ‘मरणाला स्पर्श करून आलोय ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी औरंगाबाद (सांप्रतचे छ. संभाजीनगर) येथे सरस्वती भुवन महाविद्यालयात डॉ. कोत्तापल्ले सरांची भेट झाली. मी माझे संशोधनाविषयी दुखणे बोलून दाखविले तेव्हा सर म्हणाले, “अहो, तुम्ही भलत्याच माणसाकडे आणि एवढे दूर कशाला गेलात?” आणि त्यांनी लगेच एका मार्गदर्शकास माझ्या संबंधी माहिती देऊन मला मदत केली. अलीकडे मी श्रीलंकेस गेलो होतो. त्याचे एक प्रवास वर्णन लिहिले. सरांना प्रस्तावना लिहिण्यासाठी विनंती केली तेव्हा “डॉक्टरांनी लिहायला, वाचायला आणि बोलायला मनाई केली आहे.” असे भावोद्गार त्यांनी काढले. त्यांनी अनेकांना नोकरीसाठी शब्द खर्च करून पोटापाण्यास लावले. ते बहुआयामी, सामाजिक जाण आणि भान जपणारे व्यक्तित्व होते. लोखंडाचे कण लोहचुंबकाकडे जसे आकर्षित होतात, तसे ग्रामीण विद्यार्थी त्यांचेकडे आकर्षित होत. अडचणीतील मुलांना ते अपील कोर्ट वाटत. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ते ऊर्जाकेंद्र होते. नवोदितांचा आधारवड होते. (पान क्र. ११२)

किंवा –

   “ जालना येथील ‘ वॉर अँड वॉन्ट’ तद्वतच औरंगाबाद येथील शेतकी सहाय्यक मंडळाचे कुमारराव अन्वीकर हे आजीव सभासद होते. शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीवर कार्यक्रम प्रसारित करावेत, या बाबत मार्गदर्शक म्हणून ते १९६५ ते ६८ अशी तीन वर्षे पुणे आकाशवाणी कंद्राच्या सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य होते. महाराष्ट्र कृषी समाजाचे उपाध्यक्ष, भारत कृषक समाजाचे सभासद म्हणून यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. तत्कालीन प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू २३ ऑगस्ट १९५७ रोजी औरंगाबादहून जळगावकडे जात असताना अन्वी फाट्यावर आपला ताफा थांबवून हमरस्त्यावर दादासाहेब अन्वीकर आणि कुमारराव अन्वीकर यांचा सत्कार स्वीकारला होता.

   एक माणूस म्हणून कुमारराव हे अत्यंत प्रगल्भ व्यक्तित्व होते. केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातील शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा या साठी ते अमेरिकेसह अनेक देश फिरले. त्यांच्या कार्याचे थोडेफार फलित म्हणून त्यांना शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार तसेच कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ३० ऑगस्ट २०११ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे वार्धक्याने निधन झाले. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढील अनेक पिढ्यांच्या ते कायम स्मरणात राहतील.”

(पान क्र. ११५)

   या ग्रंथात तीन पिढ्यांतील व्यक्ती प्रातिनिधिक स्वरूपात आपणास आढळून येतात. अपवादात्मक व्यक्ती दस्तावेज आणि मुलाखतींच्या माध्यमातून लेखक उभ्या करतात. मराठवाडा – विदर्भ सीमेवरील खेडेगावातील हे व्यक्तिचित्रण बघा:

१९४८ चा सप्टेंबर महिना उजाडला. रझाकार विरूद्ध पोलिस (म्हणजे मिलिट्री) असे चित्र सर्वत्र. गावात तणाव निर्माण झालेला. रझाकार दबा धरून बसायचे. पोलिस त्यांच्या शोधात. गावातील बहुसंख्य जनता अशिक्षित. काहीनी अनेक घरांना आग लावली. कोण आपले मित्र आणि कोण शत्रू हेच कळत नव्हते. हराळ रस्त्यावर साधारणपणे एक फर्लांगवर गुराढोरांसाठी एक खोपट. त्यात पंधरावीस माणसं भेदरलेल्या अवस्थेत. संध्याकाळची वेळ. मिलिट्रीचे दोन जवान खोपटाबाहेर उभे. हातात बंदुका. एक जवान ओरडतो, “बाहर निकलो.”

खोपटातले आणखीनच भयभीत. एकटे पांडनाक बाहेर येतात. कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात.

जवान: आंदर कोई मुसलमान (रझाकार) है?

पांडनाक: नाही. इथं समदे गाववाले गरीब लोक हायती.

जवान: सबको बाहर बुलावो.

पांडनाक: साब, समदे गरीब लोक हायती. तुम्हाला भेत्यात ते. म्या हात जोडतो. पाया पडतो. त्याह्यला कायबी करू नका.

जवानाला दया आली असावी. त्यांनी ऐकले, बाहेरच्या बाहेर निघून गेले.

असे हे खोपटातल्या माणसांचे हिंमतीने प्राण वाचविणारे पांडनाक.

  अशा अनेक गोष्टी आम्ही जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकलेल्या. (पान क्र.१७६)

विसाव्या शतकातील विदर्भातील एक व्यक्तिचित्र उभे करताना ते लिहितात,

१८९६ – १९०० असे अडीच – तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होता. शासनाच्या वतीने दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना सुरू होत्या. समाजाचा सहभाग म्हणून शासनाने आवाहन केले. काही श्रीमंत – सावकारांनी एक बैठक बोलावण्यात आली. वाशिम परगण्यात निवडक लोकांना बैठकीस बोलावण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचे आवाहन केले. उपस्थित काहीजण ‘आपण शासनास काय काय मदत करू शकतो,’ या बद्दल आश्वासने देऊ लागले. राघो यांनी “आपण वाशिम परगणा वर्षभर पोसतो.” असे म्हणत आपला जिल्हा वर्षभर पोसण्याची तयारी दर्शविली. याला ‘कर्ता सुधारक’ असेच म्हणावे लागेल. (पान क्र. ८३)

डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा.अविनाश डोळस, राधेश्याम गुप्ता, श्रीमती अर्चना अहिरे, ऋषिकेश कांबळे, स. सो. खंडाळकर, प्राचार्य आर. के. इंचकर, प्राचार्य नामदेवराव चापे, डॉ.शिवाजी हुसे अशा अनेक व्यक्तिरेखा उठावदार झाल्या आहेत.

   यातील व्यक्ती आपापल्या वेगळ्या वाटा चोखाळताना दिसतात. त्यांची ही कर्तृत्वगाथा आहे. त्याचबरोबर सामाजिक स्तरावरील व्यक्तीच्या वृत्ती – प्रवृत्ती अधोरेखित होतात, ही बाब मला महत्त्वपूर्ण वाटते. एकूण तांत्रिक बाबींसह ग्रंथाचा विचार केल्यास अतिशय उत्तम. मुखपृष्ठ बोलके. कागदाची प्रत दर्जेदार. व्यक्तींच्या छायाचित्रासह लेखन कसदार. यात छ. संभाजीनगर त्यातल्या त्यात सिल्लोडच्या आसपासच्या व्यक्ती जास्त आढळून येतात. असे असले तरीही ग्रंथात आणखी काही व्यक्तींचा समावेश व्हायला हवा होता. लेखकांची महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही अनेकांशी जवळीकता होती आणि आहे. आणखी अनेक दिग्गज त्यांच्या संपर्कात आहेत. त्यावर आणखी एखादा व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथ त्यांनी प्रकाशित करावा, ही अपेक्षा.

    सुप्रसिद्ध लेखक आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच छ. संभाजीनगर येथील एम. जी. एम. विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे या ग्रंथाची पाठराखण करताना म्हणतात, “पाठीचा कणा ताठ असणारी आपल्या आजुबाजूला दिसलेली, भेटलेली ही काही माणसं. भूतकाळातील आणि वर्तमानकालीन या माणसांच्या व्यक्तित्वातील बारकावे, जगण्याचा लहेजा, त्यांचे अंतरंग नि बाह्यांग आदींबाबत बारीक – सारीक आणि सूक्ष्म निरीक्षण नोंदवून प्रा. शिवाजी वाठोरे यांनी या ग्रंथाची सिद्धता केली आहे.

  कर्तृत्ववान माणसांचा इतिहास नव्या पिढीसमोर साद्यंत पोहोचला पाहिजे, या परिप्रेक्ष्यातून यातील माणसं अवतरली आहेत. भेटलेल्या माणसांच्या व्यक्तित्वाचे सौंदर्यलक्षी मूल्यांकन या ग्रंथातून आविष्कृत झाले आहे, असे दिसून येते.

   प्रा. वाठोरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून लीलया साकारलेली विविध क्षेत्रातील, विविध स्वभावाची, वैविध्यपूर्ण पण अमिट ठसा उमटवणारी ही माणसं वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतात. त्यांचे वेगळेपण हे या ग्रंथाचे सामर्थ्य आहे.”

 आपण या पेक्षा वेगळे काय म्हणणार? प्रा. वाठोरे सरांच्या आगामी लेखनास आपण सदिच्छा देऊ या.

        आपली माणसं: शिवाजी वाठोरे

        पद्मपाणी प्रकाशन, सिल्लोड, छ.संभाजीनगर

        पृष्ठे: १९२, किंमत: २८०/–

 

प्रा. प्रशांत अपसिंगेकर

 

– प्रा. प्रशांत अपसिंगेकर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top