सुधा मूर्ती यांची ‘महाश्वेता’ कादंबरी म्हणजे कोड फुटलेल्या स्त्रीची वेदना..

सुधा मूर्ती ह्या कन्नड कादंबरी क्षेत्रातील एक आघाडीच्या लेखिका म्हणून सर्वपरिचित आहेत. आज त्यांच्या नावावर पंचवीस कादंबऱ्या आहेत. आपल्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील सर्व सरकारी शाळेत संगणक आणि ग्रंथालय सुविधा पुरवणाऱ्या चळवळीच्या त्या आद्य प्रणेत्या ठरल्या आहेत. सुधा मूर्ती यांना सामाजिक व साहित्य सेवेसाठी वेगवेगळ्या राज्यातील नामांकित विद्यापीठाने सहा डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर भारत सरकारद्वारे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात देखील आले आहे असो.

 इथे सुधा मूर्ती यांच्या ‘महाश्वेता’ या प्रसिद्ध कादंबरीवर मला प्रकाश टाकायचा आहे. ‘महाश्वेता’ ही मूळ कादंबरी कन्नड भाषेत लिहिली असून तिने प्रसिद्धीचे शिखरे पादाक्रांत केले असल्याने या कादंबरीचे अनेक भारतीय भाषेत अनुवाद झालेत. मराठीमध्येही अनुवादाच्या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या, ज्यांनी कर्नाटकातील सुप्रसिद्ध यू.आर.अनंतमूर्ती,एस.एल.भैरप्पा पासून तर सुधा मूर्तीपर्यंतच्या लेखकांच्या साहित्यकृतीचे मराठीमध्ये अनुवाद केले आहे. अशा उमा कुलकर्णी यांनी सुधा मूर्ती यांच्या ‘महाश्वेता’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. मुळात अनुवाद हे प्रक्रिया फारच किचकट, प्रचंड मेहनतीची आहे. मूळ भाषेतील मजकुरातील अाशय, भाव आणि शैली यांचा तोल शेवटपर्यंत मजबूत पकडून ठेवावा लागतो. उमा कुलकर्णी ह्या कसलेल्या लेखिका असल्याने त्यांनी हे काम उत्तम त-हेने पार पाडले आहे. यात यत्किंचितही संशय नाही.

सुधा मूर्ती यांची ‘महाश्वेता’ ही कादंबरी नायिकाप्रधान आहे. यात कोड फुटलेल्या एका स्त्रीची शोकांतिका साकारली आहे. या कादंबरीच्या केंद्रस्थानी अनुपमा आहे. ती नावाप्रमाणेच अप्रतिम सुंदर आहे. तिचा आणि डॉक्टर आनंदचा प्रेम विवाह होतो. डॉक्टर आनंद हे आर्थिकदृष्ट्या पिढ्यानपिढ्या गर्भश्रीमंत, तर अनुपमा ही एका गरीब प्राथमिक शिक्षकांची मुलगी असते. तसा विचार केला तर प्रेमात गरीब श्रीमंत ह्या बाबी नगण्य असतात. प्रेम हे भावनेच्या पातळीवर एका उच्च स्थानी असते. व्यवहारिक मोजपट्ट्या त्याला लावता येत नाही. लग्न झाल्यानंतर आनंद आणि अनुपमा यांच संसारिक जीवन तीन महिन्यापर्यंत म्हणजे आनंद आपलं पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला जाईपर्यंत सुरळीत असते. मात्र आनंदने इंग्लंडला प्रस्थान केल्यानंतर दोनच महिन्यात अनुपमाच्या पायावर पांढरा डाग दिसतो. तिथून मग अनुपमाचं आयुष्य एका वेगळ्या संकटाच्या वळणावर येऊन ठेपतं. हा या ‘महाश्वेता’ कादंबरीचा मथितार्थ आहे.

खरे तर नवविवाहित स्त्रीला कोड फुटणं ही घटना अंगावर शहारे आणणारी असते. लेखिकेने जाणीवपूर्वक या विषयाला हात घालून कोड या समस्येला वाचा फोडली त्यामुळे त्या कौतुकास पात्र ठरतात. आनंद इंग्लंडला गेल्यानंतर अनुपमाच्या पायावर कोड असल्याचे निर्देशनास आल्यानंतर आनंदची आई राधाक्का तिला एक स्त्री म्हणून समजून घेत नाही. उलट तिच्यावर प्रश्नांचं भडीमार करते लग्नापूर्वीच तुला कोड असेल हे माहीत असताना तू आमची फसणूक का बर केली? राधाक्काच्या घरात कट्टर धार्मिक वातावरण असल्याने हरघडी पूजा अर्चा चालत असल्याने अनुपमावर अधिकच निर्बंध यायला लागतात तिच्या कोडाला धरून सारेच तिला अपशकुन मानायला लागतात, तिला तुच्छ लेखायला लागतात. अनुपमा जिथे बसली असेल ती जागा पाण्याने स्वच्छ करण्याचे काम घरातील कामवाली बाई करत असते . राधाक्काच्या मनात श्रीमंतीचा गर्व असतो खोटी प्रतिष्ठा असल्याने लोकलाजेस्तव ती आपल्या सुनेला कचरापेटीत जशी एखादी वस्तू फेकून द्यावी तशी ती अनुपमाला घरातून हाकलून देते. माहेरी सावञ आईचा जाच सुरू होतो. वडील असून नसल्यासारखे कारण घरात सावत्र आईची हुकूमत चालत असते इथे अनुपमाच्या बाजूने कोणीही उभे राहत नसते. तिचा माहेरी एकांगी संघर्ष सुरू असतो

अनुपमा ही माहेरी राहत असल्याने समाजाकडून नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात अनुपमाला कोड असल्याची वार्ता सर्व गावभर पसरली जाते त्यामुळे वसुधा नावाच्या सावत्र बहिणीचे जुळलेले लग्न तुटते. कारण संबंधित लोकांना वाटते की कोड हा अनुवंशिक आहे. वास्तविक कोड अनुवंशिक असल्याचे अद्यापही सिद्ध झालेलं नसतं. पण लोकांचा तसा समज असतो. वसुधाचे लग्न जुळण्याचे प्रयत्न करूनही कुठे लग्न जुळत नाही. याचा शल्य अनुपमाला टोचत असतं वरून सावत्र आईचे टोमणे सुरूच असते. अशावेळी अनुपमा हताश होते. आपण स्वतःलाच संपून टाकू असे विचार तिच्या मनात उचंबळून येतात पण आतल मन सुचवत असतं अंगावर कोड येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात तुझा काय दोष? मी आत्महत्या केले तरी सावत्र बहिणीचे लग्न जुळतीलच असे नव्हे! उलट माझ्या आत्महत्येला धरून लोक नाना प्रकारची चर्चा घडवून आणतील त्यामुळे काही झाले तरी स्वतःला संपवणार नाही. जीवनाला मी सर्व शक्तीनिशी सामोरा जाईल लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत मी कोमेजून जाणार नाही. स्वतंत्रपणे माझे जीवन मी जगेन सगळ्यांनी साथ सोडले तरीही जगेन.

अनुपमाच्या आयुष्यात एक मात्र अाशेचा दीप असतो तो म्हणजे आनंद. आनंद हा मला सर्वदृष्टीने समजून घेईल ही भाबडी अाशा अनुपमात असते त्यामुळे ती आपल्या पतीला इंग्लंडला पत्र पाठवून आपल्या कोडाविषयी सविस्तर माहिती देते. पण आनंदचे तिच्या आजाराला धरून सांत्वनपर एकही पत्र येत नाही. त्यामुळे तिचा भ्रमनिरास होतो. आनंद हा डॉक्टरी पेशात असतो त्यांन पत्नीला धीर देणं तिच्या कोडाचा इलाज करणं ह्या बाबी दूरच राहिल्या उलट अनुपमाचा कोड शरीरभर पसरला तर लोक मला नावे ठेवतील. तिला इंग्लंडला आणले तर तिच्या पोटी जन्मास येणार्‍या बाळाला कोड झाला तर? अनुपमाला इंग्लंडला आणले तर आई माझ्यापासून कायमची दूर होईल? या भीतीपोटी तो अनुपमाला एकही पत्र पाठवत नाही. ज्या व्यक्तीने एकेकाळी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं तो व्यक्ती माझ्यावर उद्भभवलेल्या आजाराला घाबरून दूर जाण्याची भाषा करतो..! अनुपमाला या विचाराने वेदना होतात स्वतः आनंदला कोड झाला असता तर त्यावेळी मी सोडून गेले असती तर, पण मी तसे केले नसते. गिरीजेला म्हणजे त्याच्या बहिणीला कोड झाला असता तर सासूने तिला घराबाहेर काढले असते का? उलट गिरीजीचं स्वैरवर्तन सुरू असताना देखील सासूबाईचे त्याकडे माहीत असून नसल्यासारखे दुर्लक्ष असायचे. केवळ संपत्तीच वैभव असल्याने सासुबाईने गिरीजेचे लग्न करून टाकले आणि आज ती एक पतिव्रता म्हणून समाजात मानाने जगत आहे तर अनुपमाचा कुठलाही दोष नसताना सद्गुण अंगी असताना केवळ अंगावर कोड उमटला म्हणून ती एका परित्यक्तेचं जीवन जगते आहे ही केवढी मोठी शोकांतिका आहे. या सर्वांकडे अनुपमा डोळसपणे बघते.

अनुपमा ही मुळातच महत्त्वाकांक्षीअसल्याने नोकरी शोधण्यासाठी ती मुंबईला आपली एम. ए. ची वर्गमैत्रिण सुमनकडे जाते. सुमनही तिला जीवन जगण्याची ताकद देते. अनुपमा तिच्याकडे काही दिवस वास्तव करते सुमनचा नवरा देखील तिला लहान बहीण म्हणूनच तिच्याकडे बघत असतो. परंतु एक दिवस मात्र घरी कोणी नसल्याचे बघून सुमनचा नवरा तिच्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न करतो. पण तो अयशस्वी ठरतो. पण सुमनचं भावी आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अनुपमा तिला याविषयी काही सांगत नाही. आणि नंतर अनुपमा ज्या ऑफिसमध्ये क्लार्कचे काम करत असते तिथल्या आपल्या टॉमी नावाच्या मैत्रीणीकडे राहते. नंतर विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून तिची निवड होते. इथे तिचे जीवन स्थिर होत असताना अकस्मात आनंदचा तिथे प्रवेश होतो. त्याला आपल्या कृतीची लाज वाटायला लागते. तो तिला क्षमा मागण्याचा प्रयत्न करतो पण खूप वेळ झालेली असते यावेळी तिच्या शरीरावर कोडाच साम्राज्य पसरलेलं असतं अनुपमा भावविवश होते ‘आनंद मला लग्नापूर्वी कोड नव्हता हे तुम्हाला माहीत होतं तरी तुम्ही आईची समजूत का बर काढली नाही? तुम्हाला कोड फुटला असता तर ?मी तुमच्यासारखा विचार केला असता तर? अनुवंशिकतेचा विचार करून तुम्हाला अशीच वाऱ्यावर सोडून गेले असते तर ?तुम्ही पुरुष आहात, मी एक स्त्री आहे एवढाच फरक. आज माझा तुमच्या कुठल्याही कृतीवर विश्वास नाही त्या सर्व नात्यातील अर्थशून्यता आज मला व्यर्थ वाटते. त्यामुळे मी तुमच्यासोबत राहू शकत नाही इथे कादंबरीचा शेवट होतो.

प्रा.दिलीप वानखडे

 

प्रा.दिलीप वानखडे भ्रमणभाष-९३५९३३८८४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top