साडे सहा फुट उंची, रूबाबदार वशिंड आणि तलवारी शिंगं असलेली खिलार बैलजोडी पोटच्या लेकरागत जपणारा ऊसतोड कामगार लहानपणापासूनच कष्टकरी असतो. बैलजोडीची शान आणि रूबाब सांभाळण्यासाठी त्याची नेहमीच धांदल उडते. दिवाळीतले कानवले आणि लाडवांची चव जिभेवर आहे तोवर, ’सरली की दिवाळी!’ असं म्हणून मुकदमाकडून ऊचल घ्यायची वेळ भरलेली असते. एकदा ऊचल घेतली की मग पाडव्याला कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत ऊसाच्या पाचटासोबत दोन हात करण्यातच ऊसतोड कामगाराची कित्येक वर्षे खर्ची पडतात. ऊस वाकडा असला तरी रस वाकडा नसतो. रस गोडच असतो. तसं ऊसतोड कामगार कष्टाचं जीनं कितीही वाकडंतिकडं असलं तरी गोड मानून जगत असतो. तो प्राप्त परिस्थितीत आनंद मानून जगतो. कष्ट करीत राहतो. त्याला कदाचित परिश्रमाची गोडी कळलेली असते. ही गोडी अतिशय कडवट असते. औषध गोळ्यांवरचा लेप गोड असतो. पण त्या गोडीखाली कडवटपणा लपलेला असतो. याप्रमाणे ऊसतोड कामगाराचं आयुष्य असतं. चोखामेळ्याला ऊसतोड कामगाराकडें पाहूनच ’ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा’ कविता सुचली असावी कदाचित.
फडात शिरलं की ऊसतोड कामगाराला दिवसं उगवल्याचं भान नसतं आणि मावळल्याचंही भान नसतं. पुढे असतो अथांग पसरलेला ऊसाचा फड आणि मुठीत सळसळणारं कोयत्याचं पातं! मनातला राग गिळून म्हणा किंवा मनात राग धरून म्हणा देहभान विसरून कोयत्याच्या पात्याची आणि ऊसाच्या पाचटाची तुंबळ धुमश्चक्री चाललेली असते. ऊभा फड सपासप आडवा होतो. त्या मोबदल्यात ऊसाचं पाचट सर्वांगाला बोचकारतं-ओरबाडतं आणि घायाळ करतं. सर्वांगावर झालेल्या जखमांवर घामाचं मलम आपोआपच इलाज करीत जातं.
पडलेला फड ऊसाच्या मोळ्यांचे पाचुंदे बांधून टायर गाडीत भरल्यावर रानात विव्हळत पडलेला पाचटाचा ढीग गाडीवानाकडं बघून दात काढल्यासारखा भासतो. गाडीवान फडात ऊसाच्या मोळ्या बांधित नसतो. तर ऊराशी कवटाळून ठेवलेली स्वप्नेच बांधित असतो. एव्हाना गाडीवान गाडीत भरलेल्या तीन-चार टन ऊसाच्या बुरूजावर चढून बसलेला असतो. तो बैलं दापतो तेव्हा ओरखड्यांनी भरलेल्या शरीरावरच्या खपल्या तापलेल्या उन्हामध्ये वखवखायला सुरूवात झालेली असते. गाडीवान थांबत नाही. त्याची जीवापाड जपलेली खिलारी जोडी तोंडाचा फेस पडेपर्यंत जीवाच्या आकांताने गाडी ओढून फडातून बाहेर काढते. गाडीवान सडकाला लागलेला असतो. कारखान्याच्या दिशेने त्यानं कूच केलेलं असतं. युद्धात दुश्मनाला चारी मुंड्या चीत करत धूळ चारून विजयाची पताका मिरवित परत स्वराज्यात परताणा-या योध्याच्या रूबाबात गाडीवान कारखान्याच्या दिशेने कूच करतो.
ऊसतोड मजूराच्या कष्टाला सीमा नसतात. असतात फक्त ऊरात दफन करून ठेवलेली स्वप्ने.! ऊरातल्या दफनभूमीतून अंकुरणारी स्वप्ने.. पोरांचं शिक्षण, लेकींची लग्नकार्ये, भावकीच्या कोर्ट-कचे-या, नांगरटीचे तास, बी भरण, पेरण्या, सुगी..स्वप्नांना या परीघाच्या उंचीबाहेर उंचीवर नेण्याचे स्वप्न असते. पट्टा पडल्यावर ही स्वप्नं पूर्ण करायची असतात. स्वप्नभंग झालेल्या स्वप्नांच्या पूर्तिसाठी पुन्हा पुन्हा पट्टा पडेपर्यंत राबराब राबावं लागतं. असंच असतं ऊसतोड कामगाराचं जगणं.! स्वप्नं दाखविणारं.. स्वप्नांच्या पूर्तिसाठी झटणारं..!
– सुशील केकान
छत्रपती संभाजीनगर
भ्रमणध्वनी – + 9665979131