हातामधुनी हळूच वाळू निसटत जाते
तसे आयुष्य जरा जरासे संपत जाते
आई कधीच मनाप्रमाणे जगली नाही
आणि मुलांना उदंड जगणे मागत जाते
मागे सुटले गल्ली अंगण बालपण जरी
आठवणींचा सुवास मागे ठेवत जाते
जवळ कुणी जे कालपर्यंत माझ्या होते
अंतर त्यांच्या आज घराचे वाढत जाते
एक प्रवासी मी ही आहे जीवनातला
पावलांपरी किती आयुष्य कापत जाते
पिवळे झाले हात मुलीचे बघता बघता
आशिष अखेर ती बापाला मागत जाते
मिलिंद जेव्हा गझल लिहीतो अंतरातली
या हृदयाची त्या हृदयावर गुंफत जाते
मिलिंद अवचित इंगळे
टेलिफोन कॉलनी मूर्तिजापूर
मो.8485861620