प्रा. शरद बाविस्कर यांच्या ‘भुरा’ या स्व-कथनच्या निमित्ताने…..

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे समतापर्वच अौचित्य साधून जेएनयू अर्थात जवाहर नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे अनुबंध’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अत्यंत ओघवत्या शैलीत शरद बाविस्कर यांनी या विषयाला हात घातला होता. सञ २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रात त्यांचं ‘भुरा’ नावाचं स्वकथन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे एम. ए.भाग -१ मराठीला अभ्यासक्रमात समाविष्ट केलं असल्याने ‘भुरा’ वाचण्याचं कुतुहल मनात अनेक दिवसांपासून होतं. पण प्रत्यक्षात ते उतरत नव्हतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. शरद बाविस्करांचं व्याख्यान संपताच त्यांच्यासोबत भेट झाली. कार्यक्रमस्थळी ‘भुरा’ कन्सेशनमध्ये विक्रीस असल्याने ते मी लगेच विकत घेतले.झपाटल्यागत ‘भुरा’ वाचायला लागलो.मनाची एकाग्रता साधत हे पुस्तक मी तीन दिवसात वाचून हातावेगळ केलं. या पुस्तकावर मनोमन विचार करायला लागलो.त्यातून माझं जे काही आकलन तयार झालं ते मी प्रांजळपणे मांडत आहे. 

         भुरामध्ये आपला गतकालीन जीवनातील खडतर शैक्षणिक प्रवास शरद बाविस्कर यांनी रेखाटला आहे. धुळे जिल्ह्यातील पाच ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या ‘रावेर’ या छोट्याशा खेड्यात लेखकांचे वास्तव्य असल्याने तिथच त्यांची मॅट्रिकला ऍडमिशन असते. परीक्षेसाठी आर्वी सेंटर आल्याने आणि तिथ स्कॉड तीन तास हजर असल्याने त्या सेंटरवरील सर्वच विद्यार्थी मॅट्रिकला नापास होतात.लेखक देखील इंग्रजीत नापास होतो.याचं शल्य लेखकाला तोचायला लागतं.पण ते स्वस्थ बसत नाहीत. प्रचंड मेहनतीच्या जोरावर अन जबर महत्वाकांक्षा असल्याने मॅट्रिक पास तर ते होतातच शिवाय ‘जेएनयू’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात प्राध्यापक पदापर्यंत मजल मारतात. वाट्याला अत्यंत हलाखीची स्थिती असताना एखादा व्यक्ती असं भव्यदिव्य यश खेचून आणू शकतो हे इथे मला महत्त्वाचे वाटते. त्या अर्थाने हे पुस्तक नुसतच वाचनीय नसून अनेकांना प्रेरणा देऊन जाते. 

         ग्रामीण भागातील तकलादू शिक्षण व्यवस्था ही नव्यान्नव टक्के विद्यार्थ्यांना निकामी करणारी आहे हे टोकदार वास्तव लेखक मांडतो.आजही यात काही फरक पडला नाही.हे पटायला लागते. 

         धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयात लेखक उच्च शिक्षण घेत असताना नेहमीप्रमाणे इथेही परिस्थिती आड येते पण त्याची तमा न बाळगता लेखक महाविद्यालयात सुरू असलेल्या ‘कमवा आणि शिका” या योजनेअंतर्गत काम करतात आणि आपला शैक्षणिक खर्च भागवतात.आपल्यातील इंग्रजीच्या भीतीला घालवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. इंग्रजीला घेरतात. इंग्रजी विषयातून लेखक बी.ए. उत्तीर्ण होतो.

         नंतर लेखक लखनऊ येथील CIEFC मध्ये एम.ए. इंग्रजीला आपली ऍडमिशन निश्चित करतात.पण नेहमीचे रडगाणे म्हणजे इथेही आर्थिक परिस्थिती आ वासून त्यांच्यासमोर उभी राहते.लेखकाला एम.ए. ला पूर्ण वेळ देणे शक्य नसते.महाविद्यालयातील लायब्ररीतून अनेक पुस्तके वाचनातून फ्रेंच भाषाविषयीचं ज्ञान ते संपादन करतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये फेंच भाषा शिकविण्याचे क्लासेस घेतात त्यातून त्यांना जी निळकत मिळते त्यातून आपला खर्च भागवतात.काही रक्कम आपल्या आईला पाठवतात. इथे लेखकांची समज मला अधिक प्रभावीत करते. लेखकांचे पाय आपल्या मातीत घट्ट रुतले असल्याने लेखक तसूभरही भटकत नाही. ते आपलं एमए पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी दिल्ली येथील जेएनयूची वाट धरतात. 

         दिल्ली येथे जेएनयूमध्ये फ्रेंच भाषेतून एमए करण्याची लेखकाला उत्कंठा असते तेव्हा आपला आर्थिक भार कमी करण्यासाठी ते फ्रेंच सांस्कृतिक केंद्रात पार्टटाइम जॉब पकडतात आणि सोबतच एमए पूर्व परीक्षेची तयारी करतात. केलेल्या जॉबमधून आलेल्या पैशातून काही रक्कम आईला पाठवतात. लेखकाची अभ्यासात झोकून देण्याची प्रवृत्ती असल्याने ते पूर्व परीक्षा देखील प्रथम श्रेणीत पास करतात. आणि जेएनयू विद्यापीठामध्ये फ्रेंच तत्त्वज्ञानाला आपला प्रवेश निश्चित करतात. आणि अथक परिश्रमातून फ्रेंच भाषेतून एम.ए. देखील ते पूर्ण करतात.

         पुढे युरोपियन कमिशनची इरास्मुस मुंडूस शिष्यवृत्ती सत्तावीस लाख परदेशातील फ्रेंच, इटली आणि इंग्लंड येथील मास्टर्स पदवी पूर्ण करण्यासाठी लेखकाला दिली जाते पण ह्या पदव्यासाठी प्रत्येक देशात सहा महिन्याचा अवधी असतो. फ्रेंच मधील वास्तव्यात असताना तेथील थंड वातावरणामुळे लेखकाला अनावर पाठीचे दुखणे सुरू होते.पण ठरवलेल्या कार्यापासून त्यांना परावृतही होता येत नाही.सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ते इटलीला उच्च शिक्षण घेतात त्यानंतर इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतात. अशा तऱ्हेने लेखक आपले परकीय शिक्षण उच्च श्रेणीत पूर्ण करतात.

         त्यानंतर लेखक दिल्ली येथे परततात आणि एका खाजगी विद्यापीठांमध्ये जॉब पकडतात नंतर जेएनयूची पीएच. डी.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करतात.पीएचडीचे लेखक आपले काम पूर्णत्वास नेत असताना.आणि त्यासाठी त्यांना जेआरएफ मंजूर झाली असताना लेखकांची पारदर्शकपणे फेंच तत्वज्ञानाचे सहायक प्राध्यापक म्हणून निवड होते. इथे लेखकांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळतो.

प्रा.दिलीप वानखडे

– दिलीप वानखडे

भ्रमणध्वनी -९३५९३३८८४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top