आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्र

 

        सौंदर्य ही सतत विकसनशील होत जाणारी प्रक्रिया आहे. सौंदर्य ही स्वतंत्र आणि स्वयंभू संकल्पना आहे. या संकल्पनेची प्रारूपे आदिम काळात दिसतात. आदिम काळातील इहवादी, समाजवादी व बुद्धिवादी जीवनशैलीत या संकल्पनेची प्रारूपे आढळून येतात. आदिम मानवी जीवन हे कलासक्त व सौंदर्यासक्तच होते. आदिम काळातील लोक केवळच कलेची निर्मिती करीत नव्हते तर निर्माण केलेली कला अत्यंत आस्थेने ते जगतही होते. त्यांच्या कलामय जगण्यात अद्वैत होते. ही अद्वैतता जीवनासंबंधीच्या आसक्तीतून प्रस्फुटित होत होती. आदिम काळात कला आणि जीवन, कलेचे सौंदर्य आणि जीवनाचे सौंदर्य, कला आणि जीवनसंघर्ष यात अंतर्विरोध नव्हता. परंतु मानवी जीवन जसजसे पुढे सरकत गेले तसतसे कला व जीवन यात फारकत होत गेली. कला आणि कलेचे सौंदर्य हे अविभाज्य आविष्कार जीवनसंघर्षापासून विन्मुख होत गेले. इतके की, कला आणि जीवनसौंदर्य या दोन गोष्टींचा स्वतंत्र व स्वायत्त विचार सुरू झाला. खरेतर हे सांस्कृतिक विलगीकरणच होते. इथल्या वर्णवर्चस्ववादी लोकांनी हे सांस्कृतिक वियुक्तीकरण करून श्रमणसंस्कृती आणि वैदिक संस्कृती असे विभाजन केले. श्रमणसंस्कृती ही कष्टकऱ्यांची होती तर वैदिक संस्कृती ही पुरोहितांची होती. हे सांस्कृतिक विभाजनच होते. हा सांस्कृतिक असमतोलच होता. तोल म्हणजे सारखेपणा, बरोबरी किंवा समानता आणि असमतोल म्हणजे समानतेचा किंवा बरोबरीचा अभाव. असमतोल म्हणजे विषमता. असमतोल म्हणजे परस्परविरोध. विषमतेच्या, असमतोलाच्या, विलगीकरणाच्या वा परस्परविरोधाच्या उदरातून जीवनाला समसमांतर करणारा मूल्याशय जन्माला येऊ शकत नाही. जीवनाला सर्वांगसुंदर करणाऱ्या आशयाचा जन्म जीवनमूल्यांच्या पोटीच होत असतो. या जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारे साहित्य हे खरे जीवननिष्ठ साहित्य असते. जीवननिष्ठा ही साहित्याची सौंदर्यनिष्ठाच असते. जीवन आणि सौंदर्य यांतील एकसंधतेचे आविष्कार हे जीवनाचे आणि साहित्याचे सौंदर्याविष्कारच असतात. हे मूल्यनिष्ठ सौंदर्याविष्कार साहित्याचे सौंदर्यशास्त्रच असते. 

        सौंदर्यशास्त्र म्हणजे साहित्यकलेचे तत्त्वज्ञान ! हे तत्त्वज्ञान दोन प्रकारचे आहेत, एक चैतन्यवादी आणि दुसरे जडवादी. हे दोन्ही तत्त्वज्ञान परस्परविरोधीच आहेत. आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्र ही संकल्पना समजून घेण्यासाठी ही दोन परस्परविरोधी तत्त्वज्ञाने समजून घ्यावी लागतात. या दोन तत्त्वज्ञानांचा संघर्ष बुद्धपूर्व काळापासूनच चालत आलेला आहे. चैतन्यवाद हा ईश्वरकेंद्री आहे; तर जडवाद हा माणूसकेंद्री आहे. चैतन्यवाद पारलौकिक जीवनाचे अवडंबर पटवून सांगतो; तर जडवाद मानवी जीवनाची महानता स्पष्ट करतो. चैतन्यवाद कलेच्या आकृतिबंधाला महत्त्व देतो; तर जडवाद आशयाला प्राधान्य देतो. चैतन्यवाद आशय आणि अभिव्यक्ती यांच्यात फारकत करतो; तर जडवाद आशय आणि अभिव्यक्ती यांचे सेंद्रियत्व विशद करतो. 

        खरेतर सौंदर्यविचाराचा आरंभ हा कलेच्या आशयापासूनच व्हायला हवा. आशयाचे अस्तित्त्व नाकारून जीवनवादी सौंदर्यमीमांसक जीवनाचे सौंदर्यशास्त्र निर्माण करूच शकत नाही. कारण सौंदर्य ही संकल्पना जात, धर्म, वर्ग, पंथ, प्रांत यांच्या अतीतच आहे. ती असीमच आहे. ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ हीच सौंदर्याची नीती असते. सौंदर्य ही संज्ञा दुनियेतील सर्वच अनीतीच्या अतीत जाणारी आहे. ती प्रज्ञानी नैतिकताच आहे. सौंदर्य ही नदीच्या प्रवाहासारखी सतत बदलत जाणारी संकल्पना असते. ‘सब्बं अनिच्चम्’ हाच तिचा स्वभाव असतो. हा स्वभाव आंबेडकरवादी साहित्याने प्रमाण मानला आहे. त्यामुळे

 आंबेडकरवादी साहित्यात सर्वांना समान न्याय, सर्वांना समान हक्क, सर्वांचे सर्वकल्याण हाच विचार प्रामुख्याने केंद्रवर्ती आहे. आंबेडकरवादी साहित्याची ही सर्वसमावेशकता मानवी मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभी आहे. मानवी जीवनाला आशयसंपन्न करणारा विचार हा सौंदर्यविचारच असतो. हा सौंदर्यविचार आंबेडकरवादी साहित्यात शीर्षस्थानी आहे.

        आंबेडकरवादी साहित्य हे प्रारंभापासूनच मानवी सर्वकल्याणाचा हेतू घेऊन जन्माला आले आहे. या साहित्यापुढे जीवनाच्या रंजनाचे प्रश्न कधीच नव्हते. रंजनप्रियता हा या साहित्याचा स्वभावच नव्हता. या साहित्यापुढे जीवनाचे प्रश्न आहेत. जीवनाच्या शोषणाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी या साहित्याने स्वतःची एक सांस्कृतिक संहिता निर्माण केली आणि इथल्या सांस्कृतिक संघर्षात उडी घेतली. या साहित्याच्या जीवननिष्ठ प्रकृतीमुळेच हे साहित्य पारंपरिक सौंदर्यशास्त्राची कोंडी फोडण्यात यशस्वी झाले आहे. पारंपरिक सौंदर्यशास्त्र हे धर्म, वर्ग, जाती आणि अध्यात्माच्या परिप्रेक्ष्यातच मशगूल राहिले आहे. खरेतर ही सौंदर्यविन्मुखताच असते. परंपरेच्या आणि अनीतीच्या कुशीतून सौंदर्य जन्माला येत नसते. सत्य, सद्विवेक, चिकित्सा, प्रयोगशीलता, नवता आणि आधुनिकता ही मूल्ये सौंदर्यजन्माच असतात. बुद्धिवाद आणि सांस्कृतिक समतोल हेच सौंदर्यमूल्यांचे अधिष्ठान असतात. या तात्त्विक अधिष्ठानावरच आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्र अधिष्ठित झाले आहे. या सुंदर तात्त्वज्ञानिक अधिष्ठानामुळेच हे साहित्य सौंदर्यशास्त्राचे अधिनायक झाले आहे. या साहित्याचा हा सौंदर्यविचार सर्वहितैषीच आहे. परंतु या साहित्याचा हा जीवनकेंद्री सौंदर्यविचार प्रस्थापित मराठी साहित्याने मान्यच केला नाही. प्रस्थापित मराठी साहित्य आणि आंबेडकरवादी साहित्य यात सांस्कृतिक भेद आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे समतावादी आहे. सामाजिक न्याय, बंधुता, भगिनीता या संविधानिक मूल्यांचा अवलंब करतो. मानवी जीवनाला परमसुंदर करणे हीच या साहित्याची नीती आहे. खरेतर ही या साहित्याची सौंदर्यमूल्येच आहेत. ही मूल्ये भारताला प्रबुद्ध करणारीच आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे मानवी जीवनातील दुःखांचे अन्वर्थन करणारे साहित्य आहे आणि हेच या साहित्याचे सौंदर्यशास्त्र होय.

        साहित्याचे सौंदर्यशास्त्र या विषयावर जागतिक विचारविश्वात विपुल चर्चाचिकित्सा घडून आलेली आहे. भारतीय साहित्यशास्त्रही याला अपवाद नाही. भारतीय साहित्यशास्त्रात साहित्याचे सौंदर्यशास्त्र या विषयासंबंधी बरेच विचारमंथन झाले. अनेक भारतीय सौंदर्यमीमांसकांनी साहित्याचा सौंदर्यशास्त्रीय विचार केलेला आहे. या सर्वच सौंदर्यमीमांसकांनी भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या साहित्यकृतीचा आशय, अभिव्यक्ती, स्वरूप, जीवनजाणिवा, जीवनदृष्टी आणि मूल्यदृष्टी अशा अनेक अंगांनी भारतीय साहित्याची सौंदर्यशास्त्रीय मूल्ये उजागर केलेली आहेत. पारंपरिक मराठी साहित्यातही साहित्याच्या सौंदर्यशास्त्रासंबंधी बरीच चर्चा-चिकित्सा झालेली आहे. त्यातून अनेक विवादाचे मुद्दे पुढे आलेले आहेत. हे विवाद साहित्य आणि जीवन यातील साधर्म्यासंबंधीचे जसे आहेत तसेच त्यातील वैधर्म्यासंबंधीचेही आहेत. आशयाचे सौंदर्य की आकृतीचे सौंदर्य यासंबंधीचेही हे वादविवाद आहेत. साहित्याच्या आकृतिबंधाला महत्त्व द्यायचे की त्याच्या आशयबंधाला प्राधान्य द्यायचे यावर पारंपरिक मराठी साहित्यात बरीच खल झालेली आहे. पारंपरिक मराठी साहित्याने साहित्य आणि जीवन या दोहोंचे सेंद्रीयत्व अमान्यच केले आहे. या साहित्याने साहित्य आणि जीवन यांतील सेंद्रिय सहसंबंधाला मान्यताच दिली नाही. साहित्याने जीवनाचे केवळच रंजन करावे, अशीच पारंपरिक मराठी साहित्याची धारणा राहिली आहे. ही धारणा कलावादीच आहे. या धारणेने कला आणि मानवी जीवन याची फारकतच केली आहे. साहित्याने मानवी जीवनातील प्रश्नांसंबंधी बोलूच नये, त्याची चिकित्साच करू नये अशीच परंपरानिष्ठ मराठी साहित्याची भूमिका राहिली आहे. ही भूमिका मराठी साहित्यात ‘कलावाद’ या नावाने ओळखली जाते. मराठी साहित्यात ही भूमिका घेऊन लेखन करणारे अनेक साहित्यिक आहेत. या साहित्यिकांना कलावादी साहित्यिक म्हटले जाते. कलावाद्यांनी मांडलेल्या सौंदर्यशास्त्रीय चिंतनात मानवी जीवनाला आणि जीवनातील प्रश्नांना पूर्णतः बगलच दिलेली आहे. मानवी जीवनाला वजा करूनच त्यांनी कलेची आणि साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी केली आहे. त्यामुळे ती साहित्याचीही मांडणी ठरत नाही आणि जीवनाचीही नाही.

खरेतर साहित्य ही जीवननिष्ठ कला आहे. मानवी जीवनसौंदर्याचा तळशोध घेणे, सौंदर्यमय सहजीवन प्रस्थापित करणे, सहजीवनाची सौंदर्यमूल्ये उजागर करणे आणि जीवनाच्या मंगलमयतेची कास धरणे हीच साहित्याची जन्मध्येये असतात. या उदात्त, उन्नत आणि सर्वांगसुंदर ध्येयांनी परिपूर्ण असलेले साहित्य हे अक्षरसाहित्यच असते. हे साहित्य कालातीतच असते. ते शाश्वतच असते. या साहित्यात सर्वांचे सर्वकल्याण करणारी मानवी सहजीवनाची सौंदर्यसूत्रे अंतर्भूत झालेली असतात. ही सौंदर्यसूत्रे मानवी जीवनाच्या अस्वस्थतेच्या क्षितिजातून उगवत असतात. मानवी जीवनासंबंधीच्या उत्कटतेतून ती प्रस्फुटित होत असतात. अस्सल साहित्य हे अंतर्बाह्य जीवननिष्ठच असते. त्यामुळे जीवनाला वळसा देऊन साहित्याचे सौंदर्यशास्त्र लिहिताच येत नाही. खरेतर साहित्याचे आणि जीवनाचे सौंदर्यशास्त्र एकच असते. साहित्याचे सौंदर्यशास्त्र लिहिणे म्हणजे जीवनाचेच सौंदर्यशास्त्र लिहिणे होय. साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करणे म्हणजे आधुनिक मूल्यांच्या धर्तीवर जीवनाची पुनर्मांडणीच करणे होय. यालाच आपण पुनर्रचना असे म्हणतो. जीवनाची पुनर्रचना करणे म्हणजे जीवनाचे नवनिर्माण करणेच असते. हे नवनिर्माण नित्यनूतनच असते. जीवनाच्या या नित्यनूतन आविष्काररूपालाच आपण जीवनांतर असे म्हणतो. परंतु जीवनाचे संपूर्ण अवस्थांतर घडून येण्यासाठी मूल्यांतर होणे आवश्यक असते. त्याशिवाय जीवन आपली कूस बदलू शकत नाही. मूल्यांतराशिवाय सौंदर्यमय सहजीवन निर्माण होऊ शकत नाही. मूल्यांतर घडून येणे ही मानवी जीवनसौंदर्याची अपरिहार्यताच असते. जुनी विघातक मूल्ये सामाजिक जीवनातून बाद करीत जाणे आणि नवी विधायक मूल्ये समाजमनात रुजवित राहणे ही जीवनसौंदर्याचीच प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून मानवी जीवनाची निकोप घडण होत जाते. आंबेडकरवादी साहित्य हे या प्रक्रियेतून उदयास आलेले साहित्य आहे. मानवी जीवनसौंदर्याच्या उत्कट ध्यासातूनच हे साहित्य पुढे आले आहे. त्यामुळे हे साहित्य मानवी सहजीवनाचे प्रीअँबल झाले आहे.

        आंबेडकरवादी साहित्याने सौंदर्यमय सहजीवनाचे गूढ समजून घेतले आहे. सौंदर्यमय सहजीवनाच्या मार्गातील अवरोधही या साहित्याने समजून घेतले आहे. त्यामुळे या साहित्याने मानवी जीवनाला रोगट करणारी मूल्यसंस्कृतीही नाकारली आणि तिची पायाभूत तत्त्वेही नाकारली. पारंपरिक मराठी साहित्याची मूल्यसंस्कृती याच पायाभूत तत्त्वांवर उभी होती. धर्म, जातीयता, अंधश्रद्धा, कर्मकांड, देव-दैववाद, अध्यात्म, स्त्री-पुरुष विषमता या तत्त्वांवरच पारंपरिक मराठी साहित्याचा डोलारा उभा होता. खरेतर ही समन्यायी जीवनाची तत्त्वेच नव्हती. ती जीवनद्रोहाचीच तत्त्वे होती. मानवी जीवनाचा तेजोभंग करणारे आणि मानवी जीवनाला विषमता करणारे तत्त्वज्ञान हे तत्त्वज्ञान नसते, तर ते तत्त्वअज्ञानच असते. मानवी जीवनाच्या मस्तिष्कावर गोंदलेल्या या तत्त्वअज्ञानाची सर्जरी आंबेडकरवादी साहित्याने केली. आंबेडकरवादी साहित्याने जीवन आणि साहित्य यांतील सौहार्दशीलता उजागर केली. हा आविष्कार मानवाच्या सन्मानासाठीच होता. या सुंदर आविष्काराने मानवाला महानता प्रदान केलेली आहे. मानवाच्या महानतेसाठीच या साहित्याने प्रखर विद्रोही रूप धारण केले आहे. या साहित्याने अंगीकृत केलेला हा विद्रोह सौंदर्याभिमुखच आहे. या साहित्याने मानवी जीवनसौंदर्याचा ध्यास घेतला आणि हे साहित्य मानवी जीवनाचे सौंदर्यविज्ञान झाले. आंबेडकरवादी साहित्याने साहित्य या जीवनकेंद्री कलेला मानवी जीवनसौंदर्याचे नवे भान दिले, नवी जाण दिली आणि माणसाला माणसासारखे वागायला लावणारे नवे शहाणपणही दिले. खरेतर हे नवनिर्माणच आहे. हे नवनिर्माण मानवी जीवनाला सौंदर्यमय करणारेच आहे. हे नवनिर्माण सर्वहितैषीच आहे. यात आदिवासी, दलित, भटके, विमुक्त, अल्पसंख्य, स्त्रिया अशा सगळ्याच समाजघटकांच्या कल्याणाचा अत्यंत सन्मानपूर्वक अंतर्भाव करण्यात आलेला आहे. हा अंतर्भाव अर्थातच सर्वांचे सर्वहित साधले जावे या सदिच्छेतून करण्यात आलेला आहे. या सदिच्छेचे गमक भारताच्या संविधानात आहे. भारताचे संविधान हे मानवी जीवनाचे क्रांतिविधानच आहे. जीवनाला निरामय करणारे ते सौंदर्यविधानच आहे. मानवी जीवनाला परमसुंदर करणारी सौंदर्यसूत्रे भारताच्या संविधानात समाविष्ट झालेली आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे सांविधानिक मूल्यांचे साहित्य आहे. त्यामुळे या साहित्याने वैज्ञानिक मूल्यांच्या धर्तीवर मानवी जीवनाला नवे सौंदर्यशास्त्र दिले आहे. 

        जीवनाचे आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र एकच असते. साहित्यकला ही जीवनलक्ष्यीच असते. मानवी जीवनाला अस्पृश्य मानून सुंदर साहित्याची निर्मिती करता येत नाही. जीवनाची मूल्ये बहिष्कृत करून साहित्याची मूल्ये सांस्कृतिक जीवनात रुजत नसतात. भारतीय साहित्यशास्त्राने जीवनाला गावकुसाबाहेर ठेवून साहित्याचे सौंदर्यशास्त्र निर्माण केले आहे. फारफार तर त्याला कलेचे सौंदर्यशास्त्र मानता येईल, जीवनाचे नाही. ते अभिजनांचे सौंदर्यशास्त्र आहे, बहुजनांचे नाही. ते विशिष्टांचे आहे, समष्टीचे नाही. विशिष्टांच्या सर्वकल्याणाची आरती गाणारा विचार हा सबंध मानवी जीवनाचा सौंदर्यविचार ठरू शकत नाही. 

सौंदर्यविचार हा जीवनविचारच असतो. ते मानवी जीवनसौंदर्याचेच तत्त्वज्ञान असते. जीवनाला समतल आणि संपन्न करणारी ती सौंदर्यसंहिताच असते. परंतु कलासौंदर्याचे तत्त्वज्ञान हेच जीवनसौंदर्याचे तत्त्वज्ञान आहे असे बिंबविले गेले आणि मानवी जीवनाची फसगत झाली. कला आणि जीवन यात फारकत केली गेली. कलेचे सौंदर्य हेच जीवनाचे सौंदर्य आहे असा आभास निर्माण केला गेला. हा आभास जीवननिष्ठ कलानिर्मितीला मारकच ठरला आहे. खरेतर ही समरसताच होती. समरस होणे म्हणजे आपल्या वैचारिक भूमिकेशी द्रोह करणेच होय. आपल्या तत्त्वांशी प्रतारणा करून प्रतिगाम्यांच्या गोटात सामील होणेच होय. हे सामिलीकरण साधनसंपन्न लोकांच्या जितके सर्वहिताचे असते, तितकेच ते साधनवंचित लोकसमूहांचे अहित करणारे असते. यात कलावाद्यांचे सर्वहित असते. त्यामुळे कलावादी लोक सतत समरस होण्याची भाषा करीत असतात. त्यांना नेमके हेच साधायचे असते. वंचितांचे सांस्कृतिक वेगळेपण बाद व्हावे यासाठी कलावादी मंडळींनी कलेचा विचार केवळच आकृतीच्या अंगाने केला, आशयाच्या नव्हे. आशयविहीन कलाविचार हा आकृतिविचारच असतो. हा विचार जीवनविन्मुखच असतो. जीवनाला गहाळ करून केलेला कलाविचार हा मानवी जीवनाचा सौंदर्यविचार ठरू शकत नाही. हा कलेचा केवळच आकृतिविचार ठरेल. परंतु कलेचा आकृतिविचार हाच जीवनाचा सौंदर्यविचार आहे असाच कलावाद्यांचा अट्टाहास राहिला आहे. या मूलतत्त्ववादी अट्टाहासाने कलेला जीवनापासून वियुक्त केले आणि मराठी साहित्यविश्वात सौंदर्यशास्त्राच्या दोन वसाहती निर्माण झाल्या. एक अभिजनांच्या सौंदर्यशास्त्राची आणि दुसरी बहुजनांच्या सौंदर्यशास्त्राची ! ह्या दोन वसाहती म्हणजे परस्परविरुद्ध अशी दोन धृवेच होत. भारतीय साहित्यशास्त्रातील हा वैचारिक संघर्षच होता. हा संघर्ष जीवनवाद आणि कलावाद या दोन छावण्यांमधील होता. हा संघर्ष भारतीय विचारविश्वात क्रांती आणि प्रतिक्रांती या नावाने ओळखला जातो. या संघर्षाने

कलेचीही हानी केली आणि जीवनाचीही ! जीवनमुक्त कला आणि कलामुक्त जीवन असे जीवनाचे आणि कलेचे धृवीकरण केले गेले. आंबेडकरवादाने जीवनाचा सामग्र्याने विचार करून जीवन आणि कला यातील परस्परविसंवाद संपुष्टात आणला. जीवन आणि कला या दोन सांस्कृतिक मूल्यांमध्ये युती घडवून आणली आणि सौंदर्यशास्त्राला नवा आशय दिला. हा मानवी जीवनाचा नवा मूल्याशयच होता. या मूल्याशयाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान लाभले आहे. 

        आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे केवळच साहित्याचे सौंदर्यशास्त्र नव्हे, तर सबंध मानवी जीवनाचेच ते सौंदर्यशास्त्र होय. आंबेडकरवादाने साहित्य आणि जीवन यात दोनता मानली नाही. आंबेडकरवादाने साहित्यविचार हा जीवनविचारच मानला. कलायुक्त जीवन आणि जीवनयुक्त कला ही मानवी जीवनाची पूर्णांकेच होत. परंतु कलावाद्यांनी जीवनाला कलेपासून आणि कलेला जीवनापासून विलग करून जीवन आणि कला या दोन पूर्णांकांना अपूर्णांकच करून सोडले. आंबेडकरवादाने या दोन अपूर्णांकांची बेरीज करून जीवनसौंदर्याचे नवे पूर्णांक तयार केले. जीवनाला सुसंपन्न, सौहार्दशील आणि सौंदर्यमय करणारे हे पूर्णांक म्हणजे आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्रच होय.

        आंबेडकरवादी साहित्य हे जीवनाला बंधुत्वाची शिकवण देणारे साहित्य आहे. मानवी जीवनात बंधुभावाचे तारांगण फुलावे यासाठी या साहित्याने जीवनाचे व कलेचे सौंदर्य एक मानले. जीवन व कला यातील विसंवादी छावण्यांच्या विरोधात विद्रोह करून जीवनाला सहजीवनाचे मोल पटवून दिले. जीवन व कला या दोन सौंदर्याविष्कारातील हे सहजीवनच आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यस्थळ ठरले आहे. परंतु मानवी जीवनाला सौंदर्यसन्मुख करणारी अशी अनेक सौंदर्यस्थळे पारंपरिक सौंदर्यशास्त्राने सौंदर्याच्या परिप्रेक्ष्यात येऊच दिली नाहीत. पारंपरिक सौंदर्यशास्त्र हे रंजनप्रिय स्वभावाचे आणि धर्मांध प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे जीवनाला बेदखल करून केवळ कलेच्या सौंदर्याभोवतीच हे सौंदर्यशास्त्र सतत घिरट्या मारीत राहिले. खरेतर कला ही मानवी जीवनाची भावनिक गरज आहे. ती जीवनाची प्रधान गरज कधीच नव्हती. कलेचे सौंदर्य ही कलावाद्यांची गरज होती. ती बहुजनांची अवश्योपाधी कधीच नव्हती. बहुजनांचे प्रश्नच फार वेगळे होते. ते प्रश्न रंजनाशी नव्हे तर जीवनाशी निगडित होते. रंजन ही सरंजामी प्रवृत्तीच्या मूठभर अभिजनांची गरज होती, तर जीवनाचे सौंदर्य ही बहुजनांच्या जीवनाची अपरिहार्यता होती. परंतु ब्राह्मणी पुरुषसत्ताकांनी कलेला जीवनापासून वियुक्त करून कला व जीवन यांच्यात संघर्ष उभा केला. बहुजनांचे नानाविध पातळ्यांवर शोषण व्हावे या दुष्ट हेतूने ब्राह्मणी कलावाद प्रयत्नशील राहिला आहे. ‘साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकातील

‘इहवादी सौंदर्यशास्त्र’ या लेखात डॉ. यशवंत मनोहर म्हणतात, “कलावाद हे वर्चस्ववाद्यांचे वाङ्मयातील शोषणाचे हत्यार आहे. ते ब्राह्मणी पुरुषसत्ताकही आहे, अर्थसत्ताकही आहे आणि वाङ्मयसत्ताकही आहे. कलावाद ही वाङ्मयातील लोकशाही नव्हे. ती वाङ्मयातील अभिजनशाही आहे. ती वाङ्मयीन पेशवाई यासाठी आहे की, वाङ्मयीन सत्तेच्या केंद्रस्थानी ती थोड्या उच्चवर्णियांशिवाय कोणाला येऊच देत नाही. केंद्र, परीघ आणि परिघाबाहेर अशी सामाजिक संरचना वाङ्मयातही जपायचे विधायक कार्य कलावाद करतो. कलावाद स्वातंत्र्यमनस्क मानवी मनाची फसवणूकच करतो. ही फसवणूक साहित्याचीही असते, अभिरुचीचीही असते आणि जीवनाचीही असते. हा कलावाद निखळ परिवर्तनविरोधी आहे. तो निखळ वाङ्मयीन मूलतत्त्ववाद आहे.” या वाङ्मयीन मूलतत्त्ववादाने हजारो वर्षे बहुजनांना मानवी सन्मानपूर्वक जगण्यापासून वियुक्तच केले आहे. इथल्या बहुजनांना परस्परांपासून तोडण्यात अभिजन नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अभिजनांचे सौंदर्यशास्त्रही याला अपवाद नाही. बहुजनविरोधी अभिजन वर्गाने कलेच्या सौंदर्यासंबंधी चिंतन मांडताना जीवनसौंदर्याचा विचार चर्चेलाच घेतला नाही. खरेतर जीवनसौंदर्याला वळसा देऊन कलासौंदर्याचा विचार करताच येत नाही, याचे भान पारंपरिक सौंदर्यशास्त्राला असल्याचे दिसत नाही. या सौंदर्यशास्त्राने जीवन व कला यांचा मेळ कधी बसूच दिला नाही.

        जीवन व कला यांत सेंद्रियत्व असते. परंतु पारंपरिक सौंदर्यशास्त्राने जीवन व कला अशा दोन स्वतंत्र व परस्परविसंवादी छावण्या निर्माण केल्या. त्यामुळे जीवन व कला यांच्यात सद्भावाचे ताटवे फुलू शकले नाही. जीवन व कला अशा परस्परविरोधी दोन छावण्या निर्माण करून पारंपरिक सौंदर्यशास्त्राने कलेचेही नुकसान केले आणि जीवनाचेही ! पारंपरिक सौंदर्यशास्त्र हे निखळच कलावादी स्वरूपाचे आहे. त्यामुळे कलेचे स्वरूप कसे असते?, विविध कला आणि त्यामधील परस्परसंबंध कोणत्या प्रकारचे असतात?, त्यांतून कलांच्या वर्गीकरणाची व्यवस्था लावता येते का ? अशाच वरपांगी प्रश्नांच्या कलासक्त दलदलीमध्ये या सौंदर्यशास्त्राचा मनूरथ अडकून पडला आहे. पारंपरिक सौंदर्यशास्त्राने सौंदर्य या संकल्पनेचा विचार केवळ कलेच्या अंगाने करून अभिजनांच्या सोयीचा सौंदर्यसिद्धांत मांडला. या सौंदर्यसिद्धांताची मांडणी करण्यातच पारंपरिक सौंदर्यशास्त्राला धन्यता वाटत आली आहे. पारंपरिक सौंदर्यशास्त्राचे हे चारित्र्यच राहिले आहे. हे वर्गचारित्र्यच आहे. धर्म, वर्ग, वर्ण, जाती आणि लिंगभेदाची जहरी रसायने घेऊन या सौंदर्यशास्त्राने इथल्या सांस्कृतिक जीवनात आपला दबदबा निर्माण केला आहे. बहुजनांना बौद्धिकदृष्ट्या गुलाम करणे हेच या सौंदर्यशास्त्राने आपले जन्मध्येय मानले आणि हेच आपले जन्मप्रयोजनही मानले. पारंपरिक वृत्तीच्या सौंदर्यशास्त्राने जीवनासंबंधीच्या प्रश्नांना विचारात न घेता कलेचे सौंदर्य पटवून देण्यातच आपले पांडित्यपण पणाला लावले. हे सौंदर्यशास्त्र आकृतिवादी आहे. या सौंदर्यशास्त्राने कलेचा विचार केवळच संरचनेच्या अंगाने केला. संरचना म्हणजे अभिव्यक्ती वा आकृती ! कलेचा आकृतिनिष्ठ विचार हा सरंजामी वर्गाला आनंद देणारा विचार असतो. मूठभर धनिक लोकांचे रंजन करणारा हा विचार असतो. या धनाढ्य लोकांचे जगण्याचे प्रश्न सुटलेले असतात. जीवन जगण्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची गरज नसते. त्यांना गरज असते केवळ रंजनाची! साधनसंपन्न लोकांचा रंजनप्रिय स्वभाव आणि निकड लक्षात घेऊन कलावादी सौंदर्यशास्त्राने त्यांच्या मागणीनुसार त्यांना हव्या असलेल्या मालाचा पुरवठा केला. त्यांच्या या स्वच्छंदीपणाने समष्टींचा जीवनानंद हिरावूनच घेतला आहे. सकलांच्या जीवनातून आनंद काढून घेण्यासाठी पारंपरिक सौंदर्यशास्त्राने असत्य हेच सत्य आहे, छंदिष्ट जगणे हेच खरे जगणे आहे असा आभास निर्माण केला.

        खरेतर असत्याच्या मैफलीत सौंदर्याचे गुणगान करताच येत नाही. सत्याला वेशीबाहेर ठेवून असत्याची महिमा गाणे हा उन्मादच असतो. अशा उन्मादी क्षितिजातून सौंदर्याचे संविधान उगवत नसते. असत्य हे सौंदर्यद्रोहीच असते. असत्याच्या आरतीत केवळच असुंदराचे कीर्तीगान होत असतात. असत्याचे पवाडे हे मानवी जीवनाची दिशाभूलच करीत असतात. त्यामुळे असत्याला सौंदर्य म्हणवून घेण्याचा अधिकारच उरत नसतो. असत्य हेच सत्य आहे आणि हेच मानवी जीवनाचे शाश्वत सौंदर्य आहे; हे पटवून देण्यासाठीच पारंपरिक सौंदर्यशास्त्र बौद्धिक झटापट करीत आले आहे. आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राने पारंपरिक ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा हा कावेबाजपणा ओळखून सौंदर्याच्या परिभाषेत अंतर्बाह्य बदल केला. सौंदर्यशास्त्राची ही पुनर्रचनाच आहे. या पुनर्रचनेला नव्या मानवतावादी मूल्यांचे तात्त्विक अधिष्ठान आहे. या संदर्भात डॉ. यशवंत मनोहर यांचे म्हणणे लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, “सौंदर्य म्हणजे जीवनाची फेरमांडणी, पुनर्रचना वा नवरचना होय.” ही पुनर्मांडणी सौंदर्यजीवी माणसाच्या निर्माणासाठीच असते. ते पुढे म्हणतात, “सौंदर्य म्हणजे सौंदर्यजीवी माणसांनी असुंदराच्या निःपातासाठी केलेला आकांत किंवा दिलेला पर्याय होय.” परंतु या सुंदर पर्यायी व्यवस्थेच्या निर्माणासाठी सर्वहारा लोकांनी संग्रामशील होण्याची गरज आहे. ही संग्रामशीलता म्हणजे सौंदर्यच होय असे त्यांनी स्पष्टच मत मांडले आहे. म्हणूनच ते पुढे म्हणतात, “सौंदर्याची गरज प्रस्थापितांना, शोषकांना नसते; सौंदर्याची गरज गरिबांना वा बहिष्कृतांना असते. परिघाबाहेरच्या पीडितांना सौंदर्याची गरज असते. जीवन कुरूप करणाऱ्यांना किंवा विषमतेचं जहर जीवनाला पाजणाऱ्यांना सौंदर्याची गरज नसते. म्हणून सर्वहारांनी सौंदर्याला आपल्या मुक्तीच्या लढाईतील शस्त्रसाठा मानायचं असतं.” डॉ. यशवंत मनोहरांची ही सौंदर्य संकल्पना मूल्यगामीच आहे. ती माणसालाच जीवनाचे महान मूल्यशास्त्र मानते. मानवी महानतेसाठीच ती जीवनकेंद्री पुनर्रचित सौंदर्यशास्त्राची कास धरते. या पुनर्रचनाश

    डॉ. सर्जनादित्य मनोहर

डॉ. सर्जनादित्य मनोहर 

नागपूर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top