संविधान संस्कृती आणि भारतीय समाज

 

        २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताने संविधानसंस्कृतीचा अंगीकार केला आणि हा देश विश्वसंस्कृतीचा सभासद होण्याच्या योग्यतेचा देश झाला. ही योग्यता या देशाला स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात प्राप्त करता आली नाही. १९५० च्या संविधानक्रांतीने या देशाला विश्वसंस्कृतीचा सभासद होण्याची सूत्रे समर्पित केली होती. या सूत्रांच्या ध्येयातील भारत हा वैश्विक जाणिवेचाच होता. हा भारत समतास्वभावीच होता. या भारताने ‘आम्ही भारताचे लोक’ या क्रांतिविधानाचा अंगीकार केला आणि आम्ही भारतीय लोक एकसंध होऊन कसा भारत घडवणार याची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा संविधानाच्या प्रीअँबलमध्ये शीर्षस्थानी आहे. ही प्रतिज्ञा प्रत्येकच भारतीय नागरिकांना इथल्या सांस्कृतिक जीवनाचे अधीनायक करणारी आहे. हे अधीनायकत्व या देशाला वैश्विक करणारेच आहे. परंतु या देशाच्या प्रकृतीला हे वैश्विक अधीनायकत्व झेपले नाही. या देशाचे अंतर्मन धर्मांच्या, जातींच्या आणि आध्यात्माच्या मूल्यांनी संस्कारित झाले होते. भारतीय एकसंधतेचे विघटन करणाऱ्या या वृत्ती-प्रवृत्तींनी संविधानाच्या ध्येयातला शोषणविहीन आणि समतामय भारत निर्माण होऊच दिला नाही. या देशात धर्माची मूल्ये हीच संस्कृतीची मूल्ये मानली गेली. मूठभर उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांच्या सर्वहिताची तत्त्वे अंतर्भूत असलेली धर्माची संस्कृती हीच मानवी कल्याणाची संस्कृती आहे असेच संस्कार इथे केले गेले. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या हा देश ठार निरक्षरच राहिला आहे. संविधानाने स्वतंत्र भारताला समर्पित केलेली उदात्त मूल्यसंस्कृती प्रकृतीतःच स्थितिशील असलेल्या या देशाच्या मनोवृत्तीला पेलवली नाही. त्यामुळे या देशाला वैश्विक मूल्यसंस्कृतीचा आधुनिक देश होताच आला नाही.

         विसावे शतक हे इहवादी जाणिवेचे शतक आहे. या शतकाने दुनियेला नवी मूल्ये दिली, नवी तंत्रज्ञाने दिली आणि मानवी जीवनात नवता उगवली. मानवी मनांवरील पारंपरिक संस्कार वेगाने विसर्जित होऊ लागले. या शतकाच्या अजिंठ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या युगीन प्रतिभेच्या लेण्या कोरल्या आणि या शतकाचा प्रारंभ चिकित्सेने झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या शतकाच्या पूर्वार्धापासूनच भारतीय समाजजीवनावर हजारो वर्षांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या इथल्या जातिसंस्थेची आणि धर्मसंस्थेची चिकित्सा सुरू केली. इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि समाजवाद हीच या चिकित्सेची मापदंडे होती. या मूल्यांच्या निकषांवरच त्यांनी धर्म, जात, अध्यात्म, ईश्वर, दैव, परलोक, आत्मा या सर्व अतार्किक गोष्टींची बुद्धिवादाच्या कसोटीवर तपासणी केली आणि या तर्ककठोर तपासणीतून शोषणयंत्रणेची बलस्थाने त्यांनी शोधून काढली. धर्म, जात, अध्यात्म हीच या यंत्रणेची सामर्थ्ये आहेत आणि या गोष्टींमध्ये गुंतून पडल्यामुळेच माणूस नाउमेद झाला आहे या निष्कर्षाप्रत येऊन ते पोहोचले. या निष्कर्षानेच त्यांना विसाव्या शतकातील महाआंदोलन केले. हे महाआंदोलन माणसाला माणूस करणारेच होते. या महाआंदोलनाने धर्माला बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि इहलोकनिष्ठा या सुंदर मूल्यसंस्कृतीचा पर्याय दिला. हे महाआंदोलन हिंदुस्थानला भारत करायला निघाले होते. भारताचे संविधान हे या महाआंदोलनाचे परमोच्च सांस्कृतिक रचित होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील या अभूतपूर्व क्रांतिकारक घटनेच्या ध्येयात पुनर्रचित भारतीय मन होते. भारतीय समाजमनाला पुनर्रचित करणारे मन पन्नास पूर्वीच्या काळात आपल्याला दिसत नाही. पन्नास पूर्वीच्या काळात सर्वांना समान शिक्षणाची, समान न्यायाची आणि समान संधीची हमी नव्हती. त्यामुळे भारतीय लोकांचे सर्वकल्याण हे तत्त्व प्रत्यक्षात अंमलात येऊ शकले नाही. २६ जानेवारी १९५० च्या संविधानक्रांतीने या तत्त्वाची प्रत्यक्ष अंमलबजावणी या देशात सुरू करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि या देशातील सर्वच अभावग्रस्त लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. भारतीय लोक प्रजासत्ताक झाले. प्रजेच्या हाती देशाची सत्तासूत्रे आलीत. संविधानक्रांतीने भारतीय प्रजेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित एक सुंदर संस्कृती दिली. ही संस्कृती एक आदर्श भारतीय संस्कृती म्हणून दुनियेच्या परिप्रेक्ष्यात वंदनीय ठरली आहे. 

        या देशात संविधानसंस्कृतीचा अंमल सुरू झाला आणि मानवी जीवनात भौतिक बदल घडून आले. परंतु भारतीय समाजाच्या मानसिकतेत मात्र फारसे बदल झाल्याचे दिसत नाही. खरेतर संविधानक्रांतीमुळे या देशात ठाण मांडून बसलेली धर्मांधता संपुष्टात यायला हवी होती. पण तसे घडले नाही. धर्मांध संस्कृतीला संविधानसंस्कृतीने छेद दिला असला तरी धर्मांधतेचे आविष्कार पुसले गेले नाहीत. हे आविष्कार पुढे अधिकच धारदार, संतप्त आणि विषारी होत गेले आणि हा देश पुन्हा धर्मांधतेच्या मूलतत्त्ववादी जाळ्यात अडकून पडला. संविधानाने दिलेली सौहार्दशील मानवी जीवनाची परमसुंदर मूल्यसंस्कृती धर्माच्या मूलतत्त्ववादी स्वभावाला पचनीच पडली नाही. विषमतेवर अधिष्ठित असलेल्या या धर्मसंस्कृतीचे रोगनिदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. त्याआधी म. फुल्यांनी केले होते. हाच रोग बुद्धाच्याही काळात होता. बुद्धाने इ. स. पूर्वच्या पाचव्या-सहाव्या शतकात या दुर्धर रोगाची लक्षणे ओळखली होती. या रोगाचे आपल्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्यांनी परीक्षण केले होते. या रोगाचे निदान करताना त्यांना धम्म गवसला आणि बुद्ध प्रबुद्ध झाले.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली या देशाला दिलेली संविधानसंस्कृती ही धम्मसंस्कृतीच आहे. संविधानक्रांती ही भारतीय समाजमनाला प्रबुद्ध करणारीच क्रांती होती. भारतीय समाजमनावरील जुने विघातक संस्कार नष्ट करणे आणि तिथे नवे विधायक संस्कार सुस्थापित करणे हाच या क्रांतीचा खरा ध्येयवाद होता. हा ध्येयवाद नितांतसुंदरच होता. भारताला समतामय करणाराच हा ध्येयवाद होता. हा ध्येयवाद सुंदर मानवी जीवनसौंदर्याच्या उदात्ततेने प्रेरित झालेला होता. धम्म हाच या प्रेरणेचा जनक होता. संविधानाची उदात्तता ही बुद्धकालीन गणराज्यातून प्रसवली आहे. बुद्धकालीन गणराज्ये ही लोकशाहीवादीच होती. या गणराज्यांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जीवनमूल्ये परमोच्चस्थानी होती. त्यामुळेच ती परमवंदनीय होती. या परमवंदनीय संस्कृतीचा स्वीकार अशोकाने केला होता. हाच स्वीकार पन्नासच्या संविधानक्रांतीने केला. संविधानक्रांती ही माणसाला माणूस करणारी संस्कृतीच होती. या संस्कृतीने धर्माच्या, जातींच्या आणि लिंगभेदाच्या नावाने इतिहासभर झालेले शोषण अनधिकृत असल्याचे घोषित केले. या शोषणसंस्कृतीचे भारतीय सांस्कृतिक जीवनातून कायम उच्चाटन व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती दिली.

        १९५६ सालची धम्मक्रांती ही मानवी परस्पर संबंधांमध्ये करुणा निर्माण करणारी क्रांती होती. मानवाला परमसुंदर करणारी आणि मानवामानवांमध्ये परस्पर मैत्रीभाव वृद्धींगत करणारी ही क्रांती होती. मानवी जीवनाला समुन्नत, समृद्ध आणि निरामय करणारीच ही क्रांती होती. या क्रांतीने संविधानाच्या ध्येयातला समतास्वभावी भारत घडवण्याचा निर्धारच केला होता. हा समतास्वभाव पन्नासपूर्वीच्या भारतात नव्हता. पन्नासपूर्वीचा भारत हा धर्मांचा आणि जातींचा भारत होता. हा भक्तीचा आणि आध्यात्मिक शक्तीचा भारत होता. हा अंधश्रद्धेचा आणि अज्ञानाचा भारत होता. त्यामुळे हा भारत अज्ञान-अंधश्रद्धांच्या घनगर्द अघोरी काळोखातून प्रज्ञानाच्या लख्ख उजेडात येऊ शकला नाही. पन्नासपूर्वीचा भारत हा रूढीप्रिय आणि परंपरानिष्ठ स्वभावाचा भारत होता. भारताच्या या स्थितिप्रिय स्वभावाने या देशाला विघटनशीलच करून सोडले होते. या विघटनशील स्वभावाच्या देशाकडे इथल्या समाजमनाला प्रबुद्ध करण्याचे सामर्थ्यच नव्हते. असंख्य तुकड्यांमध्ये विभाजित झालेल्या या देशाला १९५० सालच्या संविधानक्रांतीने एकसंध करून प्रज्ञानी भारत निर्माण करण्याचा संकल्प केला. या क्रांतीच्या अंतर्मनात प्रबुद्ध भारताचा नवा आराखडा होता. १९५६ सालच्या धम्मक्रांतीने संविधानक्रांतीच्या अंतर्मनातील प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा निर्धारच केला होता. धम्मक्रांती ही प्रबुद्ध भारताचे अभियान राबविणारी एक महान ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे समकालीन भारतातून सांविधानिक मूल्यांचे आविष्कार व्हायला हवे होते. या संविधाननिष्ठ भारतात लोकशाही समाजवादी मूल्ये बळकट व्हायला हवी होती. वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत व्हायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. आंबेडकर संस्कृतीने समकालीन भारताला एक नवी वैज्ञानिक जाणिवेची मूल्यसंस्कृती दिली होती. ही संस्कृती जीवनकेंद्रीच होती. ही संस्कृती समानुषच होती. या संस्कृतीने समकालीन भारताला एक नवा दृष्टिकोन दिला होता. हा दृष्टिकोन या देशाला प्रबुद्ध करणाराच होता. परंतु इथल्या धर्मांध आणि जात्यंध मानसिकतेने या देशाला एकसंध करणारी ही सौंदर्यसंहिता हेतुपुरस्सरच बाद केली. त्यामुळे भारत नावाच्या एकाच राष्ट्रात परस्परविरोधी स्वभावाची दोन राष्ट्रे निर्माण होत आहेत. त्यामुळे हा देश विभाजनाच्या उंबरठ्यावर आज उभा आहे.

        भारतीय संविधानामध्ये भारताची अस्मिता आहे आणि भारताच्या अस्मितेमध्ये मानवी जीवनाची सौंदर्यसूत्रे आहेत. ही सौंदर्यसूत्रे संविधानसंस्कृतीमध्ये अंतर्भूत झालेली आहेत. संविधानसंस्कृती ही सबंध मानवी जीवनाची सौंदर्यसंस्कृतीच आहे. मानवी जीवनाला उजेडसन्मुख करणारी ही सौंदर्यसंस्कृती आंबेडकरवाद या नावाने ओळखली जाते. या देशाच्या मनोभूमीत संविधानसंस्कृती रुजली असती तर आज भारत समतामय झाला असता. समता, बंधुभाव, भगिनीभाव आणि सामाजिक न्याय या सर्वांगसुंदर मूल्यांचा भारतीय समाजमनात आविष्कार झालेला आज दिसला असता. या दिशेने आंबेडकरवाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु इथल्या धर्मांध प्रवृत्तीच्या बलाढ्य शोषणसत्तेपुढे हे प्रयत्न फार दुर्बल ठरत आहेत. त्याचा फायदा घेत इथल्या सत्तास्वामींनी संविधानाच्या ध्येयातला आंबेडकरवादी भारतीय समाज निर्माण होऊ दिला नाही. 

        खरेतर १९५० पासूनच हा देश आंबेडकरवादी विचाराचा देश व्हायला हवा होता. १९५० च्या संविधानक्रांतीने या देशाला आंबेडकरवादी विचाराचा समतास्वभावी भारत करण्याचा निर्धारच केला होता. परंतु या देशातल्या धूर्त धर्मवादी राजकारण्यांनी सत्तेची सूत्रे स्वतःच्या हाती एकवटून राहावीत यासाठी या देशाला संविधानसंस्कृतीचा भारत होऊ दिला नाही. त्यामुळे हा देश आजही जातीधर्माच्या दलदलीत गटांगळ्या खात आहे. जातिधर्माचे हे गतिरोधक वंचित लोकसमूहांना संविधानसंस्कृतीने दाखवलेल्या सर्वंकष मानवमुक्तीच्या कल्याणकारी उजेडवाटेवर धावू देत नाही. धर्माच्या मूलतत्त्ववादी विचाराचे हे सनातनी खुंट संविधानाच्या अंमलबजावणीच्या काळापासून उपटून फेकले गेले असते तर या देशाला आंबेडकरवादी विचाराचा भारत होण्यापासून कोणीही रोखू शकले नसते. 

        आंबेडकरवाद हा एका जातीच्या सर्वहिताचा इझम आहे हे खूळ डोक्यातून काढून फेकण्याची आज गरज आहे. आंबेडकरवाद हा संपूर्ण समाजक्रांतीचा विचार आहे, हे तमाम वंचितांनी समजून घेण्याची आज गरज आहे. आंबेडकरवाद हे सर्वांच्या सर्वहिताचे प्रमाणशास्त्रच आहे याची गंभीर जाणीव ज्या क्षणी इथल्या वंचित-उपेक्षितांना, शोषितांना होईल तो क्षण सर्वंकष शोषणमुक्तीचाच क्षण असेल. आंबेडकरवादी तत्त्वज्ञानात मानवी जीवनाला सुंदर, युगीन, सुशील आणि समुन्नत करण्याची शक्ती आहे. या शक्तीचा अंतर्भाव संविधानात झालेला आहे. त्यामुळे संविधानाच्या दिशेने ज्या दिवशी भारत वाटचाल करेल तो दिवस या देशाला महासत्ता करणारा दिवस असेल.

 

प्राचार्य प्रकाश राठोड

– प्राचार्य प्रकाश राठोड 

नागपूर 

चलभाष : ७७०९१५१४६५

1 thought on “संविधान संस्कृती आणि भारतीय समाज”

  1. Dr.Manisha Yadav

    संविधानाला अभिप्रेत मूल्यांचं अचूक विश्लेषण

    संग्रही ठेवावे अशी विश्लेषण

    👌🏻👌🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top