पुढारी

 

रमेशची बारावीची परीक्षा आज संपली. गेल्या तीन-चार वर्षांपासून तो भीमजयंतीत हिरीरीने भाग घ्यायचा, कामे करायचा. बाबासाहेबांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करणे, साफ-सफाई ठेवणे, जयंतीत सर्वांना गोड गळ्यानी गाणी म्हणणे, पताका लावणे इ. कामे मुलांना घेऊन करायचा. तो अतिशय प्रामाणिक आणि मनाने मोकळ्या स्वभावाचा रमेश आनंदावाडीत परंपरागत पुढारलेल्या पाच-सहा जणांच्या डोळ्यात भरला होता. भीमजयंतीसह इ. सामाजिक कार्यक्रमात व वर्गण्या करून पैसा खायला चटावलेला संपत, गणपत, महादू आणि पुंजाराव यांना काही बोलता येईना.

          एकोणवीस-वीस वर्षांचा रमेश आंबेडकरी विचार प्रवाहाने संपन्न होता. सडपातळ गोऱ्या रंगाचा रमेश बुधवाड्यातल्या ह्या पुढारपणाची करतूती जाणून होता. आनंदावाडीत बौद्ध विहार व समाजमंदिर हा भिजत पडलेला वाद ह्या पुढारपण करणाऱ्यांनी मुद्दाम निकालात काढला नाही. त्यांनी पावती बिलं काढून पैसा हडपला होता, परंतु त्यांच्या विरोधात उघडपणे बोलायची कोणात हिम्मत नव्हती. भावकीचा मामला म्हणून कोणी तोंड काढीत नव्हतं. ती पाच काळ्या मनाची माणसं…

माणसं आलटून पालटून स्वतःच भीमजयंतीचे अध्यक्ष होत. पण त्यांच्यातही आता बिनसलं होतं. मागील वर्षीच्या जयंतीचा हिशोब संपतने आजवर मांडून दिला नाही, दारूत पैसा उडवला त्यामुळे त्यांचीही तोंडं वाकडी झाली होती. मार्च महिना संपत आला होता. भीमजयंतीची बैठक रुसली होती.

एक एप्रिलची सुवर्ण सकाळ उगवली होती. जयंती तेरा दिवसावर आली होती. कुठल्याही परिस्थितीत आज मिटिंग झाली पाहिजे असं रमेशचं मन त्याला सांगू लागलं. जयंतीची कुजबुज चालली होती. जुनी म्हातारी माणसं रमेशला बोलू लागली, “तू मिटिंग बोलव, आम्ही तुझ्या सोबत आहोत.” तेव्हा रमेश स्तब्ध झाला होता. त्याला काही सुचत नव्हतं. घरची परिस्थिती जेमतेम पण आपण आज जे काही आहोत हे बाबासाहेबांमुळे याची जाण मात्र रमेशच्या काळजात घर करून होती.

रमेशनी बैठक बोलावली. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर प्रत्येक घरची माणसं जमली. वर्गणी ठरली. भजनी मंडळी बसल्या, आणायचं ठरलं. बँड-ताशे लावायचे व आलेल्या पाहुण्यांचे जेवण असं ठरलं. परंतु यावर्षीच्या जयंती मंडळाचे अध्यक्षपद मात्र हे परंपरागत असलेले लोक मुद्दाम एकमेकांकडे ढकलू लागले. तेवढ्यात अनुसईचा विकास बोलला, “संपत काका तुम्हीच व्हा की अध्यक्ष, तुम्हाला अनुभव हाय, चार चौघात तालुक्यात ओळख हाय, त्यात जयंती बी तोंडावर आलीय.”

हाताने खुणावत, “नको रे बाबा काय मीच गुतं घेतलं का दरवर्षी.” तेवढ्यात त्यांचाच सहकारी महादू बोलला, “पुंजाराव तू हो.” “नको गड्या” पुंजाराव रागात बोलला. “पुढं करायचं आणि मागून कशाला नाव ठेवायचे, पैसे खाल्ले म्हणून… पैसे खर्च होतातच की पुढं झाल्यावर.” तेवढ्यात…

सटवारावचा दिगंबर बोलला, “हो जमा केलेले समाजाचे पैसे खर्चायचे नसतात, खिशातले पैसे खर्चायचे.” मिटिंगीत तणाव वाढला होता. मिटिंग विस्कळीत होते की काय ही काळजी रमेशला लागली होती.

तेवढ्यात संपतरावला डोळा मारून गणपत बोलला, “अरे ही मिटिंग ज्यांनी बोलवली त्या अर्जुनच्या रमेशलाच अध्यक्ष करा की, नवथरीच्या पोरांना संधी दिली पाहिजे.”

शांतता पसरली कुणी बोलत नव्हतं, रमेश भांबावला होता. ‘हो’ म्हणू की ‘नको’ त्याला कळत नव्हतं. इतक्यात भावकीतला गणू काका बोलला, “व्हय अध्यक्ष रमेश, आम्ही तुझ्या सोबतीला हायो.”

तेवढ्यात अर्जुन उठला व म्हणाला, “माझं पोरगं शिकलेलं सवरलेलं हाय, मी कधी कामाशिवाय तालुक्याला जात न्हाय. कुणाची ओळख ना पाळख. तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर राजी करतो पोराला. तो बी काय म्हणतो ते.” रमेशने मान हलवली, होकार दिला. परंतु पैसा खायला चटावलेले लोक मात्र सहकार्य करतील ही आशा तशी धूसर होती. परंतु बाबासाहेबांच्या नावासाठी, स्वतः झिजण्यासाठी रमेश तयार झाला होता. त्याचं मन आनंदाने भरून गेलं होतं. स्वतःच्या लग्नासारखी खुशी त्याला झाली होती. बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्याचा कारभार करण्याची संधी मिळावी हा त्याच्यासाठी दुर्लभ क्षण होता. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कैलास, आप्पा यांनी अध्यक्षपदासाठी साधी विचारपूसही केली नाही, म्हणून त्यांनी मिटिंगमधून काढता पाय घेतला.

काळ्या मनाची व आपली पत गमावून बसलेली संपत, गणपत व त्यांचे सहकारी बुधवाड्यात सामान्य बुद्धीच्या लोकांना भडकवू लागली, “ह्या अर्जुनच्या पोरात दम हाय का जयंतीचा अध्यक्ष होण्यात, नाक दाबलं तर जीव जातो त्याचा चालला जयंती मंडळाचा अध्यक्ष व्हायला.” — “आयजीने केलं म्हणून बायजीने करू नये, बायजीचे इचकते.” बुधवाड्यातले काही लोक संभ्रमीत झाले होते.

भावकीतली टिंगलखोर माणसं रमेशला ‘काय अध्यक्ष’ म्हणून उपहासाने हिणवू लागली. तो मात्र मनाला लावून घेत नव्हता. भीमजयंती सोहळा आनंदाने कसा पार पडेल याच विचाराने तो संभ्रमित झाला होता. एवढे दिवस पुढारपण करणाऱ्यांनी बुधवाड्यात दुफळी माजवली होती, असहकार्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती. बुधवाड्यावर करडी नजर ठेवणारा मराठा समाजाचा अंकुशराव मोठ्या दिमाखाने मिरवू लागला होता. एवढे दिवस जयंती मंडळाचा अध्यक्ष असलेला संपत अंकुशरावच्या घरी पाणी भरू लागला. रमेशच्या हातात मोजकेच दिवस शिल्लक राहिले होते. जयंतीची सारीच कामं ठप्प होते. निम्म्यापेक्षा जास्त वर्गणी गोळा करायची होती. बँडवाले अद्याप सांगितले नव्हते. अजून पाट्या सांगायच्या होत्या. रमेश भांबावला होता. आपल्याला कुणी सहकार्य करत नाही म्हणून त्याची स्वतःलाच चीड येत होती.

दुसरं मन त्याला सांगे अध्यक्षाने पुढं होऊन काम केलं पाहिजे. रात्रीचा दिवस केला पाहिजे. तो स्वतः चार पोरं घेऊन वर्गणी मागू लागला. लोकही आज-उद्या, असं करू लागली. काही लोक तर “तुझ्या वस्त भीमजयंती होत नाय” अशी म्हणू लागली. काही जण जयंती तोंडावर आली म्हणून पटापट पैसे देऊ लागली. आतापर्यंत पुढारपण करणाऱ्यांनी रुपया दिला नाही उलट भीतीतून निसरायची तक्रार…

नव्हती. रमेश स्वतः त्यांच्या घरी वर्गणीसाठी आला होता. संपतची बायको शेवंताबाई म्हणाली, “अरे रमेश भीमजयंतीच्या आदल्या दिवशी पोराचा बाप पैसे देणार आहे तवर मागू नको घरी बी येऊ नको उद्या देऊ.” अशाप्रकारे संपतने बायकोचे कानं भरली होती. पुंजारावही असाच बहाणा रोज सांगू लागला परंतु त्याचा मुलगा मिलिंदने मात्र त्याच्या माघारीच वर्गणी दिली होती. खोडसाळपणाने न देणारे सोडले तर वर्गणी गोळा झाली होती. बँड, भजन पाळी, पोलीस परवानगी, इ. बरीच कामे अद्याप रखडलेली होती.

जेमतेम आठवडाच राहिला होता. रमेशला रात्रीची झोप लागत नव्हती. असहकाराची भावना त्याला छळू लागली. बापही तू उगीचच मध्ये पडलास म्हणून कचकच करू लागला. “ही भावकीची माणसं तुला जगू द्यायची नाहीत असं म्हणू लागला. ज्यांच्या तोंडाला रक्त लागलेले आहे ते तुला काय जगू देणार? दारू मटणात पैसे घालणारी लोकं हायती ती.” बापाचे शब्द रमेशला सोसू लागले. मध्यरात्री मग कधीतरी त्याचा डोळा लागला होता.

सकाळीच रमेश न्हाऊन-धुऊन तयार झाला. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे येताच गणपत टवाळीच्या स्वरात बोलला, “काय अध्यक्ष झाली का जयंतीची तयारी, कुठल्या लावल्या भजनी पाळ्या, बँड कुठला परवानगीचा… कालच पोलीस जमदार भेटले होते, अर्ज आला नाही म्हणे जयंती परवानगीसाठी. कामं होत नसतील तर करू नयेत. असं बरंच काही…” त्याच्या तोंडाचा पट्टा चालू झाला होता. स्वच्छ अन् प्रतिमा असलेला, आंबेडकरी जाणीवेचा रमेश मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. त्याच्या बेसुमार प्रश्नांची उत्तरं द्यायला त्याचं मन मुकं झालं होतं. 

रात्रीच्या स्वप्नात आनंदवाडीच्या जयंती महोत्सवात बँडच्या तालावर नाचणारा रमेश, छातीठोकपणे बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करणारा रमेश चक्रावून गेला होता. त्याला काही सुचत नव्हतं. तो जड पावलांनी घरी गेला. बाबासाहेबांच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या अंगात ऊर्जा संचारत होती. आंबेडकरी विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झालं होतं. बाबासाहेबांच्या कार्यातून माघार कशी घेऊ? लोक बोलतील, थिल्लर उडवतील, मला तोंडावर पाडतील, तो त्यांचा स्वभावदोष आहे पण माझी प्रामाणिकता, निष्ठा मी कायम ठेवली पाहिजे. हे जीवन बाबासाहेबांमुळे आहे हे मला कळालंय, हे कदाचित त्यांना अज्ञानी मनाने कळालं नसेल असं बरंच काही मनातल्या मनात बाबासाहेबांपुढे पुटपुटू लागला.

इतक्यात त्याच्या मोबाईलमध्ये एक मेसेज खणखणला. रमेशची शिष्यवृत्ती जमा झाली होती. त्याचा आनंद द्विगुणीत झाला होता. ऐन भीमजयंतीला बाबासाहेबांनीच आपल्याला हे पैसे दिलेत असं त्याचं मन त्याला सांगू लागलं.

बुधवाड्यातला पोलीस पाटील भावकीतला माणूस, तसा तो ही संपतरावांच्या गोटातला परंतु जुनी मॅट्रीक असल्याने थोडी समज असलेला आणि गावाचा पोलीस पाटील, वाड्यावरची पाटीलकी घेणारा हा बाबासाहेबांच्या पुण्याईची कमाल आहे असं सांगणारा रमेश त्याच्याशी वार्तालाप करतो आणि त्याच्या म्हणण्यानुसार रामजी गायकवाड (ज्येष्ठ नागरिक), भावकीतल्या सचिनला सोबत घेऊन तो पोलीस स्टेशन व भजन पाळ्यांना सांग. ‘आपलीच पोरं आहेत ती… दोन आहेत दोंडेगावला. अडीच-तीन हजारापर्यंत ठरव, मला तालुक्यात भेटला कुणी तरी सांगतो मी ही, तू मात्र आजच जा, वेळ नाही.’ पोलीस परवाना काढ…

तुझी भंबेरी उडेल. मी तर काही भावकीच्या लोकात बोलत नाही बदमाश आहेत. माझ्या राशन दुकानावर टपले आहेत. गावातल्या लोकांना माझी पाटीलकी बरी दिसत नाही. होईल तेवढं सहकार्य करीन तू जा.”

रामजी गायकवाड भावकीतला समवयस्क निरक्षर दामू आणि रमेश सर्कलच्या पोलीस स्टेशनमध्ये आले. पी.ए.च्या टेबलावर अर्ज ठेवला. पुढच्या दालनात एक बराक होती त्यावर लिहिले होते पुरुष बंदी गृह, डावीकडे महिला बंदी गृह असणार असा मनात विचार करीत असतानाच पी.ए. कडक आवाजात बोलला, “जयंती मंडळाचा अध्यक्ष कोण आहे रे?” मी नरमाईच्या स्वरात बोललो “मीच आहे.”

“तू, तुझं वय किती?”

“वीस वर्ष, आताच बारावीची परीक्षा दिलीय.”

“तुझ्या गावात दारुडे लोक किती आहेत. या सर्कलमध्ये भांडणखोरीच्या यादीत आनंदावाडीचं नाव आहे, तुला ही जबाबदारी पेलवायची नाही. चांगला जीव लावून शिक, मोठा हो, नंतर बाबासाहेबांच्या चळवळीचं काम कर, पुढारी हो. तुला परवानगी मिळणार नाही.”

रमेशचा चेहरा पडला होता. रामजीबाबा कान टवकारून ऐकू लागला, त्याला ऐकू येत नव्हतं. “काय म्हणाले सायेब?”

“वय कमी हाय म्हणतात माझं, तुमचं आपलं गाव गोडाचं नाही असं बोलतात.”

“तेही खरं हाय, बेजारी झाली म्हणायची.”

रमेशचा काळजीने नांगरलेला चेहरा पाहून पी. ए. जाधव साहेब बोलले, “तुमच्या गावाच्या पोलीस पाटीलाला जयंतीचा रिपोर्ट करायला सांगा व हा अर्ज ही त्याला जोडून द्या. त्यांच्याशी बोलून निर्णय घेतो. उद्या बोलून…”

घेतो पोलीस पाटीलाला, की जयंतीत काही गडबड होणार नाही याची काळजी घ्या.

मान हालवून मूक संमती दिली. पो. इन्स्पेक्टरला हात जोडून पुढचा रस्ता धरला. तेथून दोंडेगाव दहा कि.मी. दुपार टळून गेली होती, ऊन कमी झाले होते. दोंडेगावच्या रस्त्याने जीप भरधाव धावू लागली. बँडवाले घरी भेटतील की नाही, गायन पार्टी आणि बँड अडीच-अडीच हजारापर्यंत मानतील की नाही असे सवंग-सुलभ विचार रमेशच्या डोक्यात गर्दी करू लागले. तेवढ्यातच रामजी बापू बोलले, “घरी भेटतील की नाही बँडवाले, उशीर होतो परतायला.”

“होऊ द्या बापू एक काम तर जवळपास मार्गी लागलंय पोलीस परवान्याचं.”

म्हाताऱ्याने मान हलवली. सोबतच्या दामू रमेशच्या चेहऱ्यावरची चिंता, म्हाताऱ्याला घरची लागलेली हुरहूर दोंडेगावची ‘जय भीम बँड पार्टी’ आणि गायन पार्टी सुपारी होईल की नाही याची खरं म्हणजे चिंताच होती. बाबासाहेबांच्या दिशादर्शक पुतळ्याजवळ गाडी थांबली. जीपमध्ये घामाघूम झालेला चेहरा रमेशने पुसला. श्रीपती कांबळे यांचं घर रमेश विचारू लागला. फटका घातलेल्या एका म्हाताऱ्याला विचारले, “श्रीपती कांबळे यांचं घर कुठंय?”

कानावराचा फटका सरकवून म्हातारं बोललं, “सरळ जा कोपऱ्यावरच पहिलं घर श्रीपतीचं हाय पण तो घरीच हाय की नाय काय माहीत, मिसन हाय चालवते बँड बेंडू हाय आणि भजनही म्हणते.”

म्हातारं घरी बरं म्हणून श्रीपतीच्या घराकडे वळता “जय भीम कांबळे दादा!”

“जय भीम” पण मी ओळखलं नाही बरं!

“आम्ही आनंदावाडीचे, वाघमारे दरवर्षी तुमचीच भजन पार्टी आणि बँड असतो की!”

विसरले राव पाहुण्यांना असं काही बोलणं झालं मग मुद्याचं बोलणं.

भजन पार्टी आणि बँड बोला. त्यांच्या बॅंड पार्टीची चार चौघं गोळा झाली. श्रीपतीने चहा देण्याचं सांगितलं. त्यांच्यात थोडी थोडी कुजबुज सुरू झाली. दिवस मावळतीकडे सरकू लागला होता. रामजी बापूची घालमेल वाढली होती. त्यांना घरी म्हातारीची काळजी वाटू लागली. तिला दम येतो जवळ ना मुलगा ना नातू, शेजारी ते शेजारीच! तेवढ्यात श्रीपती चहाचा कप हातात देत बोलला,

“काय बोलावं ते समजेना, तुम्ही नवीन एक म्हातारं माणूस तर एक पोरसवदा.”

म्हातारं फटका काढून व गुडघ्यावर टेकवत बोललं, “मला जरा ऐकू येत न्हाय जरा जोरात बोला.”

श्रीपती बोलला, “गायन पार्टी आणि बँड दहा माणसं आहोत, साडेचार हजार रुपये होतील.”

बापू श्रीपतीच्या तोंडाकडे पाहत बोलला, “लय होतं की, दोन हजार राहू द्या.”

रमेशनेही दुजोरा दिला, “राहू द्या दोन हजार.”

श्रीपतीने सांगायला सुरुवात केली, “गेल्या वर्षी तीन हजार घेतले होते, त्यातले एक हजार बाकी आहेत तुमच्याकडे, विचारा संपत वाघमारे, महादू आणि ते आले होते. हजार काही महाग झालेत. गाडीला डिझेल लागतंय, तुमचं गाव आडपेठला, रस्ता बरोबर नाही, काही पुरत नाही.”

रमेशचा जीव खाली-वरी होऊ लागला. संपत आणि महादू, गणपत ही एकाच माळीची मणी आहेत हे त्याला माहिती होतं. बोलणं फिसकटते हा अंदाज त्यांनी बांधलाच होता. मोठं धाडस अन् मन करून रमेश कळकळीने बोलला,

“अडीच हजार राहू द्या, एवढ्या लांब आलोय, तुमच्याकडे विनंती आहे आमची.”

श्रीपतीने स्पष्ट नकार देऊन पुरत नाही असं बोललं. रमेश पुरता अस्वस्थ झाला होता. निर्वाणीचं बोला एकदा म्हणून रमेश बोलला, “पाचशे रुपये कमी होतील, असल तर घेतो चिठ्ठी, नाहीतर आपला मानाचा जय भीम राहू द्या.” रमेशनी काढता पाय घेतला आणि ‘चला बापू निघूया’ म्हणून त्याचे पाय जड पडले होते.

दिवस मावळला होता. प्रवास करून घरी जायचे झाल्यास तीस कि.मी. अंतर आणि त्यात संध्याकाळचं वाहन नाही. दोन जागी गाड्या बदलाव्या. रात्रीचे दहा वाजतील घरी जायला. म्हाताऱ्याने शक्कल काढली, “रमेश पायीच निघून जाऊ. जीपचं काही खरं नाही. पैसे देऊन मध्यरात्र होईल नाहीतर मधीच रात्र गुजरल. चला निघूया पायीच.”

रमेश खचला होता. चार दिवसावर आलेली जयंती कशी होईल? अजून कशाचाच पत्ता नाही. लोक सहकार्य करीनात. विचारतंद्रीत गावची वेस मागे पडली होती. पांदन लागली होती. तिथून डोंगरदऱ्याची जुनी पायदळी पडलेली पायवाट होती. एकमेकांचे चेहरे धूसर झाले होते. गार माळरान होतं. म्हातारं सांगू लागलं, “रमेश जवानपणी आम्ही दोंडेगावला मोळी घेऊन जायचो दोन तासाचा रस्ता पण आता गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.”

तेवढ्यात दामू बोलला, “होय बापू अंगातलं बाबासाहेब आपणाला मुक बसू देत नाय!”

चालता चालता बोलता रस्ता उरकतो म्हणतात, अगदी त्याच पद्धतीने चालणं सुरू होतं. म्हातारा पुन्हा पुन्हा बायनबाईचं नाव घेई, म्हातारीचा तो आयुष्यभराचा जोडीदार होता. हे म्हातारं जोडपं गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून आनंदवाडीत राहायचं. मुलं मुंबईला होती. गावची जयंती असली तर मी येईन अशी त्यांनी चिठ्ठी पाठवली होती. म्हणूनच आमची बापूची जयंतीसाठी धडपड होती.

रात्रीचे रातकिडे किरकिर-किरकिर करू लागले. कुठेही माणसाचा थांग लागत नव्हता. चार डोंगर माथे चढूनही आनंदावाडी दिसत नव्हती. रामजी बापू बोलला, “रमेश अरे आपणाला रानभूल लागली वाटतं, गेल्या दोन तासांपासून न थांबता चालतोय आपण… अजून गावखैर दिसत नाय.” काही खरं न्हाई. रमेशही पुरता थकला होता. दामू दोघांच्या मधून जीव मुठीत धरून चालला होता. सारा काळोख दिसत होता. दामू भेदरला होता. वीस – बावीस वर्षांचा दामू भेदरला होता, कुठून सापाची सळसळ ऐकू येई तर कुठे खडखडाट, दामू दचकायचा.

रामजी बापू पुन्हा बोलला, “पोरं हो सैतान आपणाला घुमवायलंय, इथं पाच मिनिटं बसा नाहीतर आपण बाराच्या भावात जाऊ, थांबा.” दामूच्या छातीत धडधड लागली. त्याला काप भरला होता. रमेशची पावलं जडावली होती. ते तिघंही मटकन खाली बसले. लघुशंका केली, मार्गी लागले, पाऊलवाटेशी टिकाळदरी लागली होती, आता कुठे या तिघांच्या जीवात जीव आला होता.

आनंदावाडीची लाईट चमकू लागली. आनंदावाडीची कुत्री भुंकू लागली. रमेशचा स्कूल हॅन्डसेट केव्हाच ‘आऊट ऑफ कव्हरेज’ झाला होता. गाव जवळ येऊ लागलं, गावासारखीच जयंती जवळ आलीय पण काय समाजातल्या या गद्दारांनी मला पुढं करून धोका दिलाय. विचारा विचारात गाव आलं. रात्रीचे दहा वाजले असतील. रामजी बापूंनी म्हातारीला आवाज दिला, “बायजे, एऽऽ बायजे, दार उघड.” आनंदावाडीत पोहोचल्याचा आनंद न्याराच होता. रामजी बापूंना गड जिंकल्याचा आनंद भास झाला.

रमेशचा बाप दारातच निजला होता. पोराची वाट पाहून-पाहून दोघंही नवरा-बायको उपाशीच अंग टाकली होती. दामूचा बाप संपत दारू पिऊन उघडया बाजंवर अस्ताव्यस्त पडला होता. दमून-थकून आलेल्या रमेशने चार घास पोटात टाकून त्याला मेल्यासारखी झोप लागली होती.

भल्या पहाटेच त्याला जाग आली. तो भांबावला होता. त्याला कोणी सहकार्य करीत नव्हतं. आंबेडकरी जाणीवेने प्रभावित असलेल्या रमेशला जयंतीचे प्रश्न त्याच्यापुढे थयथय नाचू लागले. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जायला त्याचं मन धजावत नव्हतं. लोक जाणून-बुजून त्याची खिल्ली उडवू लागले. समाजातली शहाणी-सुरती माणसं त्याला दाद देऊ लागली. ‘आम्ही तुझ्या सोबतीला आहोत’ अशी म्हणू लागली, पण ही बोटावर मोजता येणारी माणसं होती. पुढारपण करणारी संपतची टोळी रानबोक्यासारखी खेकसकारू लागली. या रानबोक्याचा आसरा घेऊन अंकुशराव गुरकावू लागला. बुधवाडा ऐन जयंतीच्या दरम्यान धास्तावला होता.

रमेश बोधिवृक्षाकडे जाताच चार माणसं जमली. आपलाच पोलीस पाटील दारात खुर्चीवर बसला होता. रमेशला पाहून मग गणपत बोलला, “कुठंवर आली जयंती..?” संपत मध्येच बोलला, “अंकुशरावांच्या वाड्यापर्यंत…!” रमेशचा संताप अनावर झाला होता. त्याची टिंगल-टवाळी होऊ लागली, परंतु बाबासाहेबांच्या जयंतीला दुषणं लावणं, कमीपणा आणणं रमेशला खपत नव्हतं. त्याचा राग अनावर झाला होता. समाजात कधी कुणाच्या कामी न येणारा मरीया बोलला, “काय झालं बँड पार्टीचं?” संपतचा सगळा राग गिळून रमेश उत्तरला, “गेल्या वर्षीची एक हजार बाकी आहे, यंदा चार हजार म्हणतात.”

“यावर्षी फाळा ही कमी झालाय, काय करायचं? बँडबाजा, तुक्या मांगाचं? डफड लावा?” आता मात्र रमेशचे डोकं भणभणले होते. तो घरी गेला, त्याला काही कळायला मार्ग नव्हता. आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले. झोपेमध्ये संपत, गणपत, महादूचा खून करावा परंतु हे बाबासाहेबांच्या तत्त्वात बसत नाही. काय करावे?

पोलीस पाटील काकांना एकदा भेटावं, बोलावं, त्यांची मदत घ्यावी, ते आपल्या कामाला येतील असा विश्वास होता. त्यांच्या घराला कुलूप होतं. कचेरीत गेले की गावाला काही माहिती नाही? असे शेजारच्या काकीकडून समजले. डोकं भणभणलं होतं, तोंड काढायला जागा नव्हती. रमेश मनातल्या मनात झुरू लागला.

पुढारपण करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या तोंडी लागलेला रक्ताचा डाग पुसला पाहिजे. त्याची माय-बहीण एक केल्याशिवाय ही जयंती शक्य नाही. नाहीतर मला पुढं करून त्यांचंच पुढारपण सिद्ध होणार आहे. त्यांचा खोटा बुरखा फाटला पाहिजे. त्यांचा खरा चेहरा समाजापुढं आणला पाहिजे. हे नशापान केल्याशिवाय शक्य नाही. नाहीतर आपली स्वच्छ प्रतिमा डागाळल्याशिवाय राहणार नाही.

दहा रुपयांची मळकी नोट हातात घेऊन अंबादास राजू दुसऱ्या देशी चिमणीची वाट पाहू लागला. तसा राजू फार दिलदार, कनवाळू स्वभावाचा. मला पाहिलं की त्याची नशा उतरायची. तो हात जोडून, “भाऊ तुम्ही शिक्षणदार,”

भाषण मला लय पटतंय.” असं म्हणायचा. रानात सशाबरोबर पळून त्याची शिकार करणारा राजू मनाने खरंच मोकळा होता. त्याच्या हाती कडकडीत एक शंभरची नोट देत म्हणालो, “राजू, दोन देशी दारूच्या बाटल्या आण.”

ती कोरी नोट घेताना त्याचा हात चळचळ कापू लागला. तो भीत-भीत म्हणाला, “खरं की काय?”

“होय जा, आज पाहुणा येणार आहे घरी, खोटं बोललो.”

शाळेमागे जाऊन पिलो. त्यात पाण्याचा थेंब नाही. कोरी बाटली तशीच घशात रितवली. क्षणात मस्तक गरगरू लागलं. संपतच्या आई-माय-बहिणीवर शिव्या सुरू झाल्या. त्यांच्या आजपर्यंतच्या पुढारपणाचे ढोंग, खाल्लेला पैसा, पिलेला मूत यांचा भडास निघू लागला. नको नको त्या शिव्यांनी त्यांचा उद्धार केला. तो अंकुशरावचा अंकुश मोडून टाकला.

कुणीच तोंडातून एक शब्द काढत नव्हतं. माय छाती बडवून रडू लागली. बाप जोराजोरात संपत, महादू, गणपतला बजावून म्हणाला, “माझ्या पोराला जर कमी-जास्त झालं तर तुमच्या घराला ढेकूळ ठेवणार नाही.” अख्खा बुधवाडा समोर हे लोक तोंडघशी पडले होते. पाटील माझ्या मताला दुजोरा देणारे शब्द बोलत होते. बापाने राहून-राहून माझ्यावर ओरडू लागला, “तू मरशील त्याचं काय घेऊन रडू?” असं

आयुष्यात पहिल्यांदा जीव बाटला होता. मजबुरीने विष घेता-घेता दारू घेतली होती. शरीराला या गढूळ पाण्याची सवय नाही. शरीर साथ देत नव्हतं. गळा पूर्ण कोरडा पडला होता. अशक्त वाटत होतं. कधीतरी रात्री डोळा लागला होता.

सकाळी झोपेतून उठायला अवसान राहिलं नाही. अंग पूर्ण शहारले होते. रमेश नावाचा हा तरुण भीमकार्यासाठी मरणाच्या दारातून परतला होता. बुधवाड्यातला पाटील काका सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पंधरा-वीस माणसांच्या जमावात बोलला, “काय लाज उरली आपल्याला? अरे तो रमेश भीमजयंतीसाठी पायपीट करतोय, रात्रीचा दिवस करतोय अन् बाकीचे पुढारपण करणारे तोंडावर पडलेत. पोलीस स्टेशनमध्ये जाणे, बँड पार्टी, भजन पार्टी ही कामं कुठं कोणाचं अध्यक्षानं करायची काय? खायला पैसे मिळाले नाहीत की कामचोरपणा करायचा, दारू-मटणात समाजाचा पैसा उडवायचा. बस करा आता तरी.”

“गावोगावी आपले लोक कुठल्या कुठे गेलेत. त्या वरागावाचे आपले प्रत्येक घरचे माणसं नोकरीला आहेत. आपण आपल्या गावात दुसऱ्यांच्या चाकऱ्या करायच्या, दारू, जुगार, मटणात पैसा उडवायचा. बाबासाहेबांच्या विचारांनी भारावलेला रमेश जर आपल्याला सोडून गेला तर कायमचा धब्बा लागेल आपल्या बुधवाड्याला.”

पाटील काका बुधवाड्याला सत्यता सांगू लागले, “हा पोलीस परवाना घेऊन आलोय भीमजयंतीचा. रमेशची कमाल केली पी.आय. साहेबांनी, इतक्या कमी वयात जयंती मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली म्हणून…”

दोन-तीन लोकं सोडून सर्व बुधवाडा रमेशच्या बाजूने झाला होता. पाटील काकांनी स्वतः तालुक्या…

बँड लावला होता. आनंदावाडीत आनंद फुलला होता. बुधवाड्यातील लोक हर्षाने नाचू लागले होते. उद्या जयंतीची सारी तयारी झाली होती. साखरफुटाणे, द्राक्षे, खारीक-खोबरे घेऊन बुधवाड्यातील समाजबांधव रमेशला पाहायला येऊ लागले. रमेशच्या अंगात भीमरूपी ऊर्जा संचारू लागली. बाबासाहेबांची भव्य प्रतिमा बैलगाडीत मोठ्या दिमाखाने सजविली होती. पताके, निळे झेंडे घरोघरी लागले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून जो तो जयंतीसाठी सज्ज झाला होता.

बँडबाजाजा वाजू लागला. रमेशच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाटील काकांनी लाऊडस्पीकर मधून सूचना केली, “जयंती मंडळ आनंदावाडी अध्यक्ष रमेश भीमराव वाघमारे यांना विनंती आहे की त्यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा.”

रमेश जाग्यावरून उठताचा टाळ्यांचा कडकडाट झाला. रमेशने वाकून सर्व समाजबांधवांना अभिवादन केले आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!” अशा गगनभेदी घोषणा झाल्या आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. आनंदावाडी आनंदाने न्हाऊन निघू लागली. आनंदावाडीला रमेशच्या रूपाने आंबेडकरी विचारांचा पुढारी मिळाला होता.

कोंडबा भ. हाटकर

डॉ. कोंढबा भगवान हाटकर

मो. ९५५२१३३९५१

मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेवनवन, औरंगाबाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top