बोप्या

         पहाट नुकतीच झाली होती. हवेत उकाडा होता. पाखरांची किलबिल ऐकू येत होती. कालचा जळलेला मुडदा अजूनही शिलगावत होता. त्या मासाच्या जळण्याचा वास येत होता. भूरभूर राख उडत होती आणि हवेत असलेला उष्मा अजूनच वाढवत होती. 

        अंगणात खाटल्यावर झोपलेला बोप्या उठायचा कंटाळा करत होता पण इलाज नाही हे त्याला माहिती होतं. किती वर्ष झाले ह्या अशा जगण्याला हे त्याला आठवतंच नव्हतं. 

        गावात असताना दिवसभर नुसत्या उनाडक्या करायच्या, नदीवर जायचं, दुसऱ्याच्या शेतातला माल चोरून तोडायचा आणि खायचा. भाजीपाला घरी नेऊन द्यायचा. भाजी नेऊन दिली की माय खूश असायची आणि दारूच्या नशेत लोळत पडलेला बाप मधेच उठायचा, थोड्याशा कारणाने डोकं फिरवून घेत मायला आणि बोप्याला तुडवून काढायचा आणि पुन्हा गुत्त्यावर जायचा. बापाला बघितलं की त्याच्या डोक्यात तिडीक उठायची. असं वाटायचं , उचलावा एक दगड आणि घालावा त्याच्या टाळक्यात ! बाप पुन्हा दारू प्यायला जायचा. त्याला शिव्या घालत, ठेचकाळलेल्या शरीराच्या जखमांवर स्वतःची थुंकी लावत माय उठायची आणि काहीच झालं नाही अशा आवेशात चूल फुंकत बसायची. डोळ्यात धूर जाऊन तिचे डोळे लाल व्हायचे की बापाबद्दलच्या संतापाने , हे बोप्याला कधीच समजलं नाही.  

      त्याने आणलेल्या भाजीचं कालवण करून कधी भाकरी तर कधी भातासोबत त्याला वाढून देऊन माय बसायची झोपडीच्या पायरीवर बापाची वाट बघत. बाप आला की त्याच्या समोर ताटली आदळून मग टीपं गाळत चुलीसमोर बसून स्वतः खायची. झोपडीत सगळीकडून भरारारा वारा यायचा. पावसाळ्यात तर बाहेर ओलं होणं सोपं की घरात ओलं होणं सोपं हे त्याला कळत नव्हतं. सकाळ झाली की अल्युमिनियमच्या तपेलीत चहा उकळवून ठेवून माय कामाला निघून जायची. चुलीत थोडा निखारा असायचा. आणि आदल्या दिवशीचं काहीतरी शिळं उरलेलं असायचं. ते खाऊन आणि चहा पिऊन बोप्या घराबाहेर पडायचा.  

           आजूबाजूच्या पोरांसोबत गावभर उंडारत फिरायचा. झोपडीतून बाहेर पडताच त्याचा व्रात्यपणा सुरू व्हायचा. दारासमोर नाली वहायची. मुद्दाम त्यात दगड टाकून शेजारच्या घरासमोर सांडपाणी जमेल असं करायचं, कोणाच्या बकरीचा कान करकचून पिळायचा, एखाद्याचे टोपल्याखाली झाकलेले कोंबडे मोकळे करून द्यायचे, नाहीतर कोणाच्या चुलीत पाणी ओतून धूम ठोकायची. माय घरी आली की रोज शेजारच्या बायका कलकल करत यायच्या. बोप्या घरात आला की रोज ती त्याला सपासप मारायची. 

        रोज काही ना काही कारणांनी मार खायचा, जेवायचं, वस्तीभर धिंगाणे घालायचे आणि झोपायचं. आयुष्यात अजून काही करायचं असतं हे त्याला कधी जाणवलंच नव्हतं. 

         असाच एका रात्री मार खाऊन झोपलेला बोप्या जेवायला उठला नाही. मायने आवाजही दिला नाही. मधेच त्याला भुकेनी जाग आली तेंव्हा माय त्याच्या जवळच्या अंथरुणात नव्हती. पण आतून तिचे आवाज येत होते. त्या एका खोलीच्या झोपडीला पडदा म्हणून मायची एक विरलेली साडी तेवढी लावली होती. ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत दोन खिळे ठोकून त्याला बांधलेली सुतळी आणि त्या सुतळीला अडकवलेली साडी म्हणजे पडदा होता. बोप्याला भूक लागली होती आणि आतून मायच्या किंचाळण्याचे आवाज येत होते. बोप्या आधी घाबरून उठून बसला आणि मग हळूच उठून उभा झाला. मायला आवाज देऊ की आत जाऊ त्याला समजत नव्हतं. मधेच फाडफाड झापडा मारण्याचा आवाज आला. माय अजूनच किंचाळली. बाप घाणेरड्या शिव्या घालत होता. बोप्याचं टाळकं सटकत होतं. माय किंचाळत होती; आणि मग बापाच्या किंचाळण्याचा त्याला आवाज आला. बोप्या हिंमत करून, पडदा बाजूला करून आत जाणार तितक्यात माय पातळ सावरत बाहेर आली. तिचा डोळा सुजला होता आणि ती संतापाने थरथर कापत होती. 

        बोप्या तिच्याकडे बघत होता पण तिला ते भान नव्हतं. ती खोपटाचं दार उघडून बाहेर आली आणि बापाला घाण शिव्या घालत बसली. बोप्याने हलक्या हाताने पडदा बाजूला करून पाहिला तर बाप उताणा झोपला होता. 

बोप्या चूपचाप आपल्या जागेवर येऊन आडवा झाला पण भुकेनी त्याला झोप लागत नव्हती. तो मायची वाट बघत होता पण ती आत आली नाही त्याला झोप लागेपर्यंत.

         सकाळी त्याला जाग आली तर ऊन चांगलं वर आलेलं होतं. आज माय कामावर गेली की नाही गेली हे त्याला कळत नव्हतं. तो उठून आत आला आणि भीतीने किंचाळला. बाप काल जसा पडला होता तसाच पडलेला होता. पण काल अंधारात त्याला दिसलं नव्हतं ते आता दिसलं. बापाचं डोकं फाटून सगळीकडे रक्त जमलं होतं. माय त्याची किंचाळी ऐकून अंगणातून आत आली आणि मेलेला बाप बघून कपाळावर हात मारत मटकन खाली बसली. 

       त्या दोघांचा ओरडाआरडा ऐकून बाजूचा म्हमद्या खोपटात आला आणि तोंडावर पालथा हात घेऊन बोंब मारत सुटला मेला, मेला म्हणून. 

        सगळी वस्ती जमा झाली. माय तर पुतळा झाली होती जणू ! कालपासून बोप्याच्या पोटात असलेली भूक अजून खवळली होती. बापाभोवताल रक्त साचलं होतं. त्याच्या अंगावर घाणेरड्या माश्या घोंघावत होत्या. साऱ्या वस्तीत आगीसारखी बातमी पसरली की मायनं बापाचा जीव घेतला. मायला तर काहीच समजत नव्हतं. फक्त एकदा तिने बोप्याला जवळ घेतलं आणि कसं होईल आता ह्या लेकराचं , म्हणत शेजारच्या मंगूमावशीच्या खांद्यावर डोकं ठेवून हंबरडा फोडला होता. तितक्यात टकटक बूट वाजवत पोलीस आले. खाकी साडी नेसलेली बाई आली. मायला गाडीत घालून घेऊन गेली.

         बोप्याला जवळ घेऊन माय ऊर फोडून घेत होती. त्यातल्या एका पोलीसबाईने मायच्या कानाखाली एक झापड मारली आणि तिला गाडीत कोंबलं. माय एकदम गपचूप झाली. बोप्या घरात आला. तर अजून पोलीस होते. कोणीतरी बोप्याला शेजारी म्हमद्याकडे जायला सांगितलं. म्हमद्याच्या बायकोनं बोप्याला ब्रेडचे दोन तुकडे आणि चहा दिला. त्यानं ते आधाश्यासारखं खाल्लं. पुन्हा मिळेल ह्या आशेनी बशी चाटत बसला. मागून येऊन म्हमद्याच्या बायकोने त्याच्या पाठीत रट्टा हाणला आणि आता चाटूचाटू बशी खाशील का, अशी बडबड केली. पाठीत रट्टा बसल्यावर बोप्याला मायची आठवण आली. रोज मायचा एक तरी रट्टा खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नव्हता. 

          बोप्या उठला आणि झोपडीकडे आला. बापाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून कुठेतरी नेत होते. बापाला गाडीत घातलं आणि त्याच्या त्या खोपटाला पोलिसांनी कुलूप घातलं. आता कुठे राहू? काय खाऊ? बोप्याला काहीही समजत नव्हतं. सगळे शेजारी पांगले. बोप्या एकटाच उरला. सांडपाण्याची नाली जिथून वाहत होती; त्या पायरीवर तो बसून राहिला. तिथे एक गांडूळ वळवळत होतं. बोप्याने त्याला एक काडी टोचली. ते वळवळ कारण थांबवून पुढे सरकायला लागले. त्याच्या तोंडाशी ती काडी लावल्यावर ते मागे सरकायला लागलं. बोप्याला मजा आली. कितीतरी वेळ तो हाच खेळ करत होता आणि हसत होता. शिर्क्याची म्हातारी त्याला समोरच्या खोपटातून बघत होती. तिला वाटलं वेड लागलं पोराला माय बाप गेल्याने. ती आपली कंबरड्यावर हात ठेवून बाहेर आली. कपाळाजवळ तळवा नेला, डोळ्यावर हात ठेवून, डोळे बारीक करून ती त्याच्याकडे बघत उभी राहिली. 

“दसरथ, ओय दसरथ, त्या लेकराले आन जो हिकडं. याड लागल्यावानी करून रहायलं ते.”

खोपटात आत तोंड घालून म्हातारी ओरडली. 

दशरथ बाहेर आला. .

“रिकामे झेंगटं कायले लावून घेतं? त्याले जलमभर सांभाळू का मी? खुनी मायचं पोट्ट हाय ते.रिकाम्या पंचायती करू नगं. चल व्हय आत. पोलिस मांग लगतीन ते येगळं. चाल्ली मोठी पुयका दाखवायले “

वस्सकन ओरडून त्याने म्हातारीला आत नेलं आणि खोपटाचं दार लावलं. म्हातारी परत खिडकीशी बसून बोप्याला बघत होती. अंधार व्हायला लागला. बोप्याला भिती वाटायला लागली. परत भुकेचा डोंब पोटात उसळला. पण कोणीही त्याला विचारलं नाही. बोप्याला मायची आठवण येऊन रडू यायला लागलं. आणि तितक्यात पुन्हा पोलीस आले. बोप्याला घेऊन गेले. पुढे बोप्या कुठे गेला ते वस्तीत कोणालाच कळलं नाही. 

 इकडे पोलीस बोप्याला स्मशानात घेऊन गेले. त्याच्या बापाच्या चितेला अग्नी द्यायचा होता. वस्तीत आणि नातेवाईकात कोणीच जबाबदारी घेत नव्हतं.

       स्मशानात बोप्याला माय दिसली. ती एका दिवसात काळी दिसत होती. बोप्या हरखून मायजवळ धावत गेला. त्याला वाटलं आता तो आणि माय पुन्हा सोबत राहू शकतील. मायचे हात दोरखंडाने पाठीवर करकचून बांधले होते आणि मायला खूप मारलं होतं. 

         मायनं बोप्याला जवळ घेतलं आणि खूप रडली. बोप्याचा जीव गुदमरून जाईल इतकं तिने त्याला जवळ घेतलं. पोलिसबाई आली आणि मायच्या हाताला हिसडे द्यायला लागली. माय कोलमडून पडली. बोप्यानी जवळचा दगड उचलला आणि पोलीसबाईच्या दिशेने भिरकावला. तो तिला लागला नाही. तिच्या थोडा बाजूने गेला पण ती खवळून बोप्याच्या अंगावर आली आणि फाडकन त्याच्या कानाखाली वाजवली. बोप्या हेलपाटून खाली आपटला. तितक्यात शिट्टी वाजवत दुसरा पोलीस आला. बापाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून आणलं आणि मायसमोर कुठला तरी कागद धरला. मायने त्याच्यावर अंगठा मारला आणि मग बापाला घेऊन ते आत गेले. मायने बोप्याला परत जवळ घेतलं.

डाव्या पायातल्या बोटाचं एक जोडवं काढून मायने त्याच्या हातात दिलं. म्हणाली की लेकरा कधी भेट होईल माहीती नाही. पण हे जवळ राहू दे. एक माझ्याकडे असेल एक तुझ्याकडे. इतकीच खूण असेल आपण एकमेकांना ओळखायची. मी सुटका झाली की तुला शोधत वस्तीत येईन.

   बोप्याच्या गळ्यात असलेल्या ताईताच्या दोऱ्यात ते जोडवं तिनं अडकवून दिलं आणि ती पोलीसबाई मायला घेऊन निघून गेली.

बोप्या त्या दिवशी स्मशानात थांबला ते आजतागायत.

        आता हे सगळं त्याला आठवत होतं. काल अशीच एका बाईची अखेरची यात्रा आली. पोलीस घेऊन आले. पोलिस काही त्यानंतर पहिल्यांदा नव्हते आले. का ते माहित नाही पण कालपासून त्या प्रेतासाठी चौथरा तयार करताना बोप्या खूपच हळवा झाला होता. त्याला कालपासून सतत लहानपण डोळ्यासमोर येत होतं. 

          त्या दिवशी बापाला जाळलं आणि मायला घेऊन पोलीस निघून गेले. काहीही सुचत नसलेला बोप्या तसाच बसून राहिला. त्याला घराचा रस्तासुद्धा नीट आठवत नव्हता. दिवसभर त्याच्या सोबत उनाडक्या करत फिरणारे सगळे दोस्त पण ह्या तीन दिवसात गायब झाले होते. रात्र झाली. बोप्या तसाच बसून होता. हातपाय अखडून गेले होते. पोटात भुकेने कालवाकालव व्हायला लागली होती. तहानेने घसा कोरडा पडला. बोप्याला आता रडायला यायला लागलं. त्याला कदाचित समजायला लागलं होतं की आता ह्या जगात आपण एकटेच आहोत. 

        तो त्या चौथऱ्याजवळ गुढघ्यात तोंड खुपसून रडायला लागला. अंगावर बापाच्या प्रेताच्या आगीच्या उष्ण झळा येत होत्या. कडकड हाडं मोडण्याचा आवाज येत होता. मास जळत होतं. मधेच एका ठिकाणाहून आगीतून हात वर आल्यासारखा ज्वाळा आल्या. बोप्या घाबरला. किंचाळला. आता त्याला अजिबात आवरत नव्हतं. तो मोठ्याने भोकाड पसरून रडायला लागला. त्याचं रडणं ऐकून स्मशानात काम करणारा परश्या त्याच्याजवळ आला. स्वतःच्या झोपडीत नेऊन त्याला खायला दिलं. आणि मग बोप्या तिथलाच झाला. परश्याला कोणीच नव्हतं. आणि बोप्याला सुद्धा आता कोणीच नव्हतं. हळूहळू परश्यासोबत तो स्मशानात राहून एकेक काम शिकला. चिता तयार करणे,. राखड सावरणे, चौथरा साफ करून देणे वगैरे वगैरे. परश्या थकत होता आणि बोप्या त्याची कामं सांभाळत होता. बोप्यासाठी परश्या म्हणजे सगळं काही होता. परश्याला साधा ताप आला तरी बोप्या हैराण व्हायचा. 

              दारू पिऊन बुकलून काढणारा बाप हळूहळू धूसर झाला. माय मात्र मनातून हलत नव्हती. मायची खूप आठवण आली की गळ्यातल्या काळया दोऱ्यात बांधलेलं जोडवं उचलून तो कपाळाला आणि डोळ्याला लावायचा. माय आयुष्यात कधीतरी नक्की भेटेल ही आस त्याच्या मनात कायम होती. 

      उन्हं अंगावर यायला लागली तसा बोप्या उठला. तितक्यात कुणाची तरी यात्रा स्मशानात आली. खसखस चूळ भरून त्याने तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. आणि तो त्या प्रेतासाठी चिता रचायला गेला. अग्निसंस्कार झाला, लोकं थोडावेळ बसले, रडले. समोरच्या टपरीवर चहा प्यायले, सिगारेट फुंकली आणि निघाले. 

    बोप्या मधेच जाऊन परश्यासाठी चहा करून आला. त्याला चहासोबत शिळी भाकर दिली आणि स्वतः चहा पिऊन बाहेर आला. कालची चिता थंड करून चौथरा साफ करावा लागणार होता कारण तिथे दोनच चौथरे होते.

       ह्या प्रेतासाठी उद्या तिसरा दिवस असूनही कोणीच येणार नाही, हे बोप्याला माहिती होतं कारण ते पोलिसांनी आणलेलं बेवारस प्रेत होतं. 

राखड थंड व्हावी म्हणून बोप्याने फावड्याने ती खालीवर केली.

उष्ण वाफा निघाल्या. मास जळून गेलेलं होतं. हाडांचे तुकडे होते. पाण्याचा हलका शिपका त्याने त्यावर मारला. सगळीकडे धूर दाटला. बोप्याला ठसका लागला. हवेनी त्या चितेची राख भुरभुर उडत होती. चटचट आवाज करत निखारे पेटत होते. 

आणि

आणि एका हाडात काहीतरी चमकलं असं बोप्याला वाटलं. त्याने तिथे जास्ती पाणी टाकलं. ते हाड हातात उचलून बघताना त्याला चटका लागला. बोटावर फुंकर मारली त्याने. राखड डोळ्यात जाऊन डोळ्यातून पाणी आलं. त्याने डोळे चोळत ती वस्तू बाहेर काढली. 

पाण्याच्या बादलीत बुडवली आणि काढली.

ते जोडवं होतं.

गळ्यातला ताईत काढून बोप्याने दोन्ही जोडवी एकमेकांना लावली. आणि मोठ्याने हंबरडा फोडला

“माय वं”…….

******************************

– गायत्री मुळे

“वेदवास्तु” बडकस चौक, गजानन महाराज मंदिराजवळ, महाल, नागपूर ३२.

1 thought on “बोप्या”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top