मराठी संतसाहित्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय

प्रास्ताविक 

महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत संत विचारांचा विशेष प्रभाव आहे. संतांच्या आचार, विचारावर माणसांची श्रद्धा होती. त्यांनी मानवतावादी मूल्यांची शिकवण देऊन भक्तीच्या मार्गाने लोकांना सत्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत गरीब असा कोणताही भेद न करता अठरा पगड जातीमधील स्त्री-पुरुषांना वारकरी संप्रदायाने सामावून घेतले. समस्त मानव जात एक मानून “विश्वची माझे घर” निर्माण करण्याचे महान कार्य संतांनी केले. जन्माधारित विषमता नाकारून सर्वाकडे सारख्या नजरेने पाहण्याची समदृष्टी संतांनी दिली.

ज्या मूल्यांचा जागर संतांनी केला ती मूल्य आपल्या भारतीय संविधानात दिसतात. संतांनी आपल्या साहित्यात स्वातंत्र, समता, न्याय, बंधुता या मूल्यांना महत्त्व दिले. तर संविधानाने तेच मूल्य कायद्याच्या माध्यमातून स्थापित केले. संविधान आणि संत साहित्य दोघेही मानवांना एकत्र येऊन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देतात. समाजाला जोडणारे, टिकवून ठेवणारे साहित्य म्हणजे संत साहित्य होय.

उद्दिष्टे :

 संतांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे.

संतांच्या चरित्रांचा अभ्यास करणे.

संतांनी त्यांच्या साहित्यातून सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये अभ्यासणे.

महत्त्व :-

मराठी साहित्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायातील संत यांच्या जीवन कार्यावर मोठ्या प्रमाणात लेखन झालेले दिसून येते. संत साहित्यातील समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय ही मूल्ये महत्त्वाची आहेत. संत साहित्यातील ही मानवी मूल्ये व्यक्तींना जीवन जगण्यासाठी आधार ठरलेली आहेत. संत साहित्यातील या मानवी मूल्यांमुळे व्यक्ती अधोगतीला न जाता त्याला सद्गती प्राप्त होते. सत्य, अहिंसा, परोपकार, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, श्रमप्रतिष्ठा ही मानवी मूल्ये व्यक्ती आचरणात आणण्यास मदत होते. त्यामुळेच संत साहित्यातील या मानवी मूल्यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे ठरते.

“समता म्हणजे सर्वांना समान अधिकार, संधी आणि वागणूक मिळणे.” यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा मग तो जात, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणाने असो. संतांनी नेहमीच सर्व मानव समान आहेत, असा संदेश दिला. जात, धर्म आणि जन्माधारीत भेदभाव दूर करून वारकरी संतांनी समतेची बीजे समाजात रुजवली. विषमता नाकारून सर्वाकडे सारख्या नजरेने पाहण्याची समदृष्टी संतांनी दिली. वारकरी संतांनी स्त्रियांनाही समान हक्क दिले.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, सावतामाळी, चोखामेळा, सोयराबाई, जनाबाई, नरहरी सोनार, कान्होपात्रा, गोरोबा कुंभार, परिसा भागवत इत्यादी सर्व जातीतील संतांनी पंढरीच्या वाळवंटात समतेचा आणि मानवी मूल्यांचा झेंडा रोवला.

“नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll”

असे म्हणत संतांनी समतावादी प्रबोधनाची परंपरा इथल्या मातीत सुरू केली. वारकरी कीर्तन परंपरा सर्वांना सामावून घेत पुढे जात राहिली.

“या रे या रे लहान थोर l याती भलती नारी नर ll

असा पुकारा करीत वारकरी संतांनी भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे आग्रहाने सांगितले.

“शुद्ध करी मन, समता धरी ध्यान l

तरीच बंधन तुटेल रे ll”

असा संत नामदेवांचा आग्रह होता. तसेच 

“सर्वभूती समदृष्टी हेचि भक्ती गोमटी l”

सर्वांविषयी समान दृष्टी ठेवणे, कोणी लहान, कोणी मोठा नाही हीच भक्ती चांगली आहे, असे संत नामदेवांचे सांगणे होते. 

संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

“कुळ जाती वर्ण l हे अवघेची गा अकारण l

एथ अर्जुना माझेपण l सार्थक एक l

  भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, कोण कोणत्या जातीत, कुळात, वर्णात, कोठे जन्मला याला महत्त्व नाही. हे सर्व भेदभाव कारणाशिवाय निर्माण झालेले आहेत. क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, पापी, शूद्र, जर मला भजत असतील तर ते सर्व माझेच आहेत.

मध्ययुगीन महाराष्ट्रात समतेचे तत्व आणि महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न वारकरी पंथाने केला. संत तुकारामांनी या विचाराची पताका मोठ्या अभिमानाने फडकवली. आपण सर्व मानव प्राणी एकच आहोत. नाव, प्रदेश, भाषा वेगळी असली तरी सर्वांच्या अंत:करणांमध्ये असलेले मानवता हे मूल्य शाश्वत स्वरूपाचे आहे. 

“भेदाभेद भ्रम अमंगळ l”

त्यामुळे इतर कोणत्याही कारणावरून स्वतःला वेगळे समजणे हे अमंगळ म्हणजेच वाईट असल्याचे संत तुकोबा सांगतात.

याति कुळ येथे असे अप्रमाण l

गुणांचे कारण असे अंगी ll

धर्म, जात, गोत्र, कुळ ही सर्व मानवनिर्मित आहे. जन्मावरुन नव्हे तर कर्मावरून त्या माणसाचे मोठेपण मोजले जाते असे संत तुकाराम सांगतात. ते म्हणतात, जात हे प्रमाण नसून गुण हेच प्रमाण आहे. उच्च-नीच, विटाळ, शिवाशिव,सोवळे -ओवळे या गोष्टीमुळे माणसां माणसामध्ये जो भेद केला जातो आणि जे भेद करणारे आहेत, त्यांचा समाचार घेतांना ते लिहितात –

महारासि सिवे l कोपे ब्राम्हण तो नव्हे l

तया प्रायश्चित काही l देह त्याग करिता नाही ll

नातळे चांडाळ l त्याचा अंतरी विटाळ l

ज्याचा संग चित्ती l तुका म्हणे तो त्या याती ll

महार जातीतील माणसाला स्पर्श झाल्यानंतर स्वतः उच्च समजणारा जो ब्राम्हण संतापतो. तो खरा ब्राम्हण नव्हे, असे संत तुकाराम या अभंगातून सांगतात. जातपात मानणाऱ्या ब्राम्हणाला तर त्यांनी देहान्त प्रायश्चितांची शिक्षा सुनावली आहे जो जातपात मानतो, मग तो कोणत्याही जातीतील असो. तोच खरा नीच प्रवृत्तीचा असतो. हेच संत तुकारामांना या अभंगातून सुचवायचे आहे. 

संविधानाने जो सामाजिक समतेचा विचार सांगितला आहे. त्याचे आचरण संतांनी स्वतः केले होते. म्हणूनच शिंपी, सोनार, माळी, कुंभार, महार, कुणबी, ब्राम्हण आणि स्त्रिया यांना वारकरी संप्रदायात “संधीची समानता” होती. 

भक्तीचा दोर गळ्यात टाकून मी पंढरीचा चोर धरला आहे, असे म्हणणारी संत जनाबाई,

“हातामध्ये टाळ, खांद्यावरी विणा,

आता मज मना, कोण करी l”

 असा प्रश्न विचारत भक्तीच्या मार्गावरून चालू लागते. तेव्हा भारतीय संविधानाने सांगितलेले स्त्री -पुरुष समानतेचे तत्व पंढरपूरच्या महाप्रांगणात शेकडो वर्षांपूर्वीच रुजलेले दिसू लागले. 

समतेच्या तत्वाचा जागर करताना समर्थ रामदास म्हणतात – 

पृथ्वीवरील जितकी शरीरे l तितुकी भगवंताची घरे ll

 शरीररुपी मंदिरात परमेश्वराचे वास्तव्य असते हे मान्य केले. तर जन्मजात, जातीभेद, श्रेष्ठ, कनिष्ठता नाहीशी होईल आणि म्हणूनच “देव नाना शरीरे धरितो” असा विश्वास त्यांनी प्रकट केला.

“स्वातंत्र म्हणजे अवाजवी निर्बंधाची अनुपस्थिती आणि आपले हक्क आणि अधिकार वापरण्याची संधी स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होय.”

संत तुकारामांच्या काळात तर सर्वसामान्य माणसांवर अनेक निर्बंध धर्माच्या आडून लादली गेली होती. त्यांच्या वैयक्तिक जीवनात धर्म ढवळाढवळ करत होता. संत तुकारामांनी आपल्या आयुष्यात सदैव आपल्या विवेकाला प्राधान्य दिले होते. लोक काय म्हणतात यापेक्षा स्वतःची बुद्धी काय सांगते हेच त्यांनी महत्त्वाचे मानले. स्वाधीन आणि पराधीन बुद्धीच्या बाबतीत ते म्हणतात –

 साधन तयासी साधे रे स्वाधीन बुद्धी l

पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ll

ज्याची बुद्धी स्वाधीन असते तो आपले साध्य प्राप्त करतो, याउलट जो पराधीन असतो त्याचा मोठा घात होतो हे त्यांचे वचन मानवी जीवनात स्वातंत्र्य या मूल्याला असलेले महत्त्व अधोरेखित करते. संत तुकाराम म्हणतात –

सत्य असत्याशी मन केले ग्वाही l

मानियेले नाही बहुमता ll

हजारो वर्षाच्या परंपरा असोत की कोट्यावधी लोकांची मत, वृत्तवाहिन्या असोत या कोणत्याही दिशेने येणारे जे काही असेल ते विवेकाच्या कसोटीवर छाननी करून स्वीकारले तरच आपण स्वातंत्र्याचे निकोप पद्धतीने रक्षण करू शकतो.

माणसाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय लागली की, तो आपल्या अंगी असलेल्या शक्तींना विसरून जातो व स्वातंत्र्यही गमावून बसतो हे सांगताना संत तुकाराम म्हणतात.

शुके नळिकेशी गोवियेले पाय l

विसरून जाय पक्ष दोन्ही ll

शुके म्हणजे पोपट, पोपटाला नळीवर बसण्याची सवय लागली की, त्याला नळी हाच आपला खराखुरा आधार असल्याचे वाटते. तो नळीच्या आधाराने गुलाम बनतो. आपल्याला दोन पंख आहेत हेच तो विसरून गेलेला असतो. आत्मभान विसरलेली माणसं आपले सामर्य्थ आणि स्वातंत्र कसे हिरावून बसतात, याचे अचूक वर्णन त्यांनी या अभंगात केलेले आहे. 

ज्या काळात सगळे अध्यात्म संस्कृत भाषेत होते. त्या काळात मराठी या लोकभाषेत आग्रहाने आधात्मविद्या देण्याचे कार्य संत नामदेव, संत ज्ञानदेवांनी केले. स्वतःचे परंपरेपेक्षा वेगळे असणारे विचार धाडसाने आणि आग्रहपूर्वक मांडले. ज्याला संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले आहे, त्याचा उत्तम अविष्कार आपणास नामदेवादी वारकरी संतांच्या अभंगवाणीत दिसतो. संविधानाच्या प्रास्ताविकात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, उपासना, श्रद्धा यांचे स्वातंत्र सांगितले आहे. संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत तुकारामांनी त्यांच्या काळात या गोष्टीचा जोरदार पुरस्कार केला होता. 

“स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास l”

असा जनाबाई स्वतःचा अनुभव सांगतात, स्त्रियांनीही भक्तीमार्गात यावे असा उपदेश जनाबाई करतात, स्त्रियांनाही विठ्ठलाची भक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे असे त्यांना वाटते.

“बंधुता म्हणजे प्रेम आणि आपुलकीची भावना जी लोकांना एकत्र आणते बंधुता सामाजिक संबंधांना बळकट करते, कारण ती लोकांना एकत्र येऊन काम करण्यास आणि एकमेकांना मदत करण्यास प्रवृत्त करते.”

संतांनी लोकांना एकत्र येऊन प्रेम आणि सहकार्याने जगण्याची शिकवण दिली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊली म्हणतात 

जे खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो l

भूता परस्परे जडो l मैत्र जीवाचे ll

संत ज्ञानदेवांच्या साहित्यातून सर्व माणसे परस्परांशी प्रेमाने वागावीत त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, त्यातून जीवाचे मैत्र निर्माण व्हावे सर्व माणसांच्या हातून सत्कृत्ये घडावीत, त्यांच्या मनातला अंधकार दूर व्हावा असे सकारात्मक तत्वज्ञान मांडले आहे.

“हे विश्वचि माझे घर l”

असे संत ज्ञानदेव म्हणतात, हे संपूर्ण विश्व माझे घर आहे, सर्व माणसे माझी बंधू आहेत, त्यामुळे ते कोणताही भेदभाव करीत नाही.

“जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात l” असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर बंधुतेची समग्र व्याख्याच करतात ते म्हणतात –

“या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, 

हा जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही,

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी”

असा बंधुभाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत आहे. 

“न्याय म्हणजे नैतिकदृष्ट्या, विवेकवादाने, नैसर्गिक दृष्टीने, निष्पक्षतेने, समतेने योग्य असणे. न्याय म्हणजे समन्वय साधने. म्हणजेच समाजातील आदर्श मूल्य व मानवी संबंध यांच्यात समन्वय साधने म्हणजे न्याय होय.”

 संतांनी नेहमीच अन्याय आणि अत्याचाराचा विरोध केला आहे आणि समाजातील गरीब व दुर्बळांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. संत चोखामेळा, संत सोयराबाई यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागला. संत चोखामेळा म्हणतात –

 सुखे पंढरीराया l माझी निववावी काया l

 बहु तापलो संसारा l कोठवरी येरझारा l

अवघे दुःखाचे साकडे l 

न सरेचि हे कोडे l

शिणलो दातारा l चोखा म्हणे मज तारा l

चोखामेळांचे संस्कार संपन्न, संवेदनक्षम आणि भक्तिप्रवण मन सामाजिक अन्यायविरुद्ध आक्रदन करते.

 

निष्कर्ष :-

१) संतांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये त्यांच्या साहित्यातून मांडली. जी एका चांगल्या समाजासाठी आवश्यक आहे.

२) संतांनी सर्वसामान्य माणसांच्या हक्क -अधिकारांसाठी प्रस्थापित व्यवस्थेशी लढा उभारला.

३) संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली.

४) संतांचे अभंग हे मानवी मूल्यांनी ओत प्रोत भरलेले आहेत, त्यातून मानवी हिताचाच विचार त्यांनी मांडला आहे.

 

संदर्भ ग्रंथ :-

१) संतसाहित्य आणि समाजप्रबोधन – संपादक प्राचार्य रा. तु. भगत- दिलीपराज प्रकाशन.

२) महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य –बा. रं. सुंठणकर

– लोकवाड्:मय गृह.

३) महाद्वाराच्या पायरीशी -संपादक -हेमंत इनामदार, ल. रा.नासिराबादकर.

 

– प्रा. कु.भारती बाजड

मूर्तिजापूर 

2 thoughts on “मराठी संतसाहित्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय”

  1. Manisha Yadav

    संत साहित्य व राज्यशास्त्र यांचा किती जवळचा संबंध आहे हे लेखातून छान पद्धतीने मांडले

  2. Shrikrishna Shamsundar

    भले तरी देवू कासेची
    नाठाळा माथी हाणू काठी
    तुकोबांच्या अंभगात बंधुता आणि रोखठोक पणा भरीव आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, सोयराबाई, समता, न्यायालयात विठ्ठल मुख्य न्यायनिवाडा करणार आहे.
    ऊसडोंगा परी रस नव्हे डोंगा….. सुखाचे हे नाव आवडीने गावे….. छान लेख….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top